'तिला' रक्ताच्या नात्यांनी फटकारले पण.. माणुसकीच्या 'माहेर'ने स्विकारले!

सुनंदा पवार यांनी आजीला मिळवून दिला 'माहेर'संस्थेचा आधार
'तिला' रक्ताच्या नात्यांनी फटकारले पण.. माणुसकीच्या 'माहेर'ने स्विकारले!

कर्जत | प्रतिनिधी

मुलांचे संगोपन-शिक्षण, संसाराचा गाडा ओढत आयुष्यभर राबणारी घरातील माऊली जेंव्हा वृद्धपकाळाने एका जागी स्थिरावते तेंव्हा तिला गरज असते ती आधाराची! पण रक्ताची नाती स्वार्थ आणि फायद्यापुढे कायमची गोठून जातात आणि आधाराविना ती माऊली कुढत जगाचा निरोप घेते. मात्र अशा जेष्ठ नागरीकांना मायेची सावली मिळाली तर याहून वेगळं सुख काय असावे?

भांबोरा (ता.कर्जत) येथील एका वृद्ध आजीला आधार मिळवून देत आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी जेष्ठ नागरीकांचा सन्मान तर केलाच आहे. मात्र समाजातील अशा निष्ठुर,बेजबाबदार प्रवृत्तीला कडाडून विरोध देखील केला आहे.'भांबोरा येथील मंदिरात एका वयोवृद्ध आजींना त्यांच्या नातेवाईकांनी सोडले असुन या आजींना आधाराची खुप गरज आहे' अशा आशयाचा फोनकॉल तेथील महिला सरपंच माधुरी लोंढे यांनी सुनंदा पवार यांना केला.जेवणाअभावी शरीरात त्राण न राहिलेल्या या आजींना नीट उभा देखील राहणे शक्य होत नव्हते.वेळ न दवडता आजींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. सलाईन औषधोपचार देण्यात आले आणि हलक्या आहाराने आजी सावरल्या.त्यांना उठता-बसताही येऊ लागले.

आजींची पुन्हा फरफट होऊ नये म्हणुन सुनंदा पवार यांनी पुणे येथील 'माहेर' या एकट्या व नातेवाईकांनी सोडून दिलेल्या नागरिकांना आधार देणाऱ्या व त्यांच्या हातांना काम देणाऱ्या संस्थेस संपर्क साधला.आणि या संस्थेने देखील आजींसाठी माहेरचे दार खुले केले.सुरक्षित वातावरणात आज आजी तेथे राहत आहेत.जे शरीराने चांगले आहेत त्यांचे ठिक आहे पण,ज्यांना हालचालच करता येत नाही,जे विकलांग आहेत अशा जेष्ठ नागरीकांचे काय? हे दुःख सांगताना सुनंदा पवार व्यथित झाल्या आहेत.'प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ असतो.लहान मुलासारखे त्यांना जपावे लागते.कुटुंबातील सदस्यांनी त्यांची काळजी घ्यावी असे सुख सर्वांच्या नशिबात नसते.आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने आपापल्या जेष्ठ नागरिकांचा प्रेमाने सांभाळ करावा' अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.

आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांनी आपल्यासाठी खुप मोठा त्याग केलेला आहे.त्यांच्या कष्टामुळेच कुटुंब उभे राहिलेले आहे.त्यांनी स्वतःच्या आवडी-निवडींना मुरड घालून आयुष्यभर दुःख पेलले.त्यांनी घेतलेले कष्ट विसरून त्यांना आधार देण्याऐवजी निराधार करून सोडून देणे कितपत योग्य आहे? त्यामुळे त्यांना जपा त्यांना तुमच्या आधाराची खरी गरज आहे.

सुनंदा पवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com