
कर्जत |तालुका प्रतिनिधी|Karjat
जग, देश, राज्य आणि नगर जिल्ह्यात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणामध्ये पसरत असून रोज हजारो रुग्ण आढळून येते आहेत. तालुक्यातील राशीन, सिद्धटेक, माही जळगाव येथे करोना रुग्ण आढळले होते. कर्जत शहर सुरक्षित होते. शहरांमध्ये मात्र एकही रुग्ण आढळून आला नव्हता. अखेर पाच महिने संघर्ष करणार्या शहरांमध्ये करोना घुसलाच. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी ही माहिती दिली. रुग्ण आढळल्यामुळे शहरात बुधवारी (दि. 15) चांगलीच खळबळ उडाली.
कर्जत येथील ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांची यात्रा आजपासून (दि. 16) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण कर्जत तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. प्रशासन, ग्रामस्थ, मानकरी, पुजारी यांनी यात्रा रद्द केली आहे.
तीन दिवस जनता कर्फ्यू लावल्यामुळे कर्जत शहरांमध्ये बुधवारी सकाळपासून सर्व दुकाने, व्यापार, व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होते. नागरिकही सर्व घरांमध्ये थांबून होते. अत्यावश्यक सेवा असलेले दवाखाने व मेडिकल सेवा फक्त सुरू होती. सकाळी 2 तास दूध व्यवसायाला परवानगी दिली होती. अन्य सर्व व्यवहार दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. पोलीस प्रशासन देखील रस्त्यावर उतरून नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, यासाठी प्रयत्न करताना दिसून आले.
नगरपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस व महसूल विभाग यांनी तो परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केला आहे. याप्रमाणे नगरपंचायतीने सर्वत्र फवारणी देखील केली आहे. कर्जत येथील प्रसिद्ध असलेले खाजगी डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक रुग्णांची रोज तपासणी करून त्यांच्यावर उपचार करत होते.
खर्या अर्थाने करोना पार्श्वभूमीवर हा योद्धा संघर्ष करत होता. मात्र अखेर या योद्ध्याला करोनाची बाधा झाली. थोडासा त्रास होऊ लागताच 10 दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल बंद ठेवले होते. यानंतर स्वतः खाजगी रुग्णालयांमध्ये भरती होऊन त्यांनी त्यांचा स्वॅब खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला. यामध्ये ते आबाधित आढळून आले.
त्यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी स्वतः प्रकृती चांगली असल्याचे सांगतानाच सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आता त्यांचा अहवाल काय येतो, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.