प्रशासनाकडून कारवाईमध्ये दुजाभाव का?
सार्वमत

प्रशासनाकडून कारवाईमध्ये दुजाभाव का?

भाजपा शिष्टमंडळाचा प्रांताधिकार्‍यांना सवाल

Arvind Arkhade

कर्जत|तालुका प्रतिनिधी|Karjat

1 ऑगस्ट रोजी माहिजळगाव येथे झालेल्या दूध प्रश्नावर आंदोलन केलेल्या आंदोलकांवर प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले. लोकप्रतिनिधी मात्र शासकीय नियमांचे पालन करीत नाहीत याचा जाब आज भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना विचारला.

कर्जत तालुका भाजपाचे शिष्टमंडळ हे सोमवारी (दि. 10) प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटीला गेले होते. शिष्टमंडळाने कर्जत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्यावर भेटीदरम्यान प्रश्नांची सरबत्ती केली. ज्या पद्धतीने भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ते शेतकरी हिताच्या प्रश्नाला वाचा फोडत असताना क्रूरतेने केलेला राजकीय दबावातील प्रकार दिसून येतो. लोकशाही मार्गाने रीतसर पद्धतीने आंदोलन केले गेले असताना देखील आंदोलकांवर पक्षपातीपणे गुन्हे दाखल केले गेले.

कर्जत- जामखेडचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे करोना पार्श्वभूमिवर कसल्याही प्रकारच्या शासकीय नियमांना आचरणात न आणता आपले वर्तन करीत आहेत. ते सामान्य जनतेला अडचणीचे ठरेल, असे वर्तन करत असताना त्यांना कायद्याची मोकळीक कशासाठी? असा प्रश्न उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह शिष्टमंडळाने उपस्थित करत प्रांताधिकार्‍यांना धारेवर धरले.

प्रशासन हे पक्षपातीपणा करत आहे. सर्वांना समानत्वाची वागणूक देत नसल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. अशाच प्रकारे प्रशासनाकडून परिस्थिती हाताळली गेल्यास मोठा आगडोंब होऊ शकतो हे प्रशासनाने लक्षात घ्यावे, असा निर्वाणीचा इशारा शिष्टमंडळाने दिला.

कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत,अन्यथा आंदोलकांच्या झालेल्या उद्रेकास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. या शिष्टमंडळात कर्जत उपनगराध्यक्ष राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, भाजपा समन्वयक पप्पू धोदाड, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, काकासाहेब धांडे, तालुका सरचिटणीस सुनील काळे, उमेश जेवरे, भाजपा नेते सुनील यादव यांचा समावेश होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com