कर्जतचा वकिल लाचप्रकरणी जाळ्यात

भिगवण येथील पोलिसासह केले जेरबंद
कर्जतचा वकिल लाचप्रकरणी जाळ्यात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अपघातातील गुन्ह्याची कागदपत्रे देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 20 हजार रुपये लाच स्वीकारताना इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व कर्जत तालुक्यातील वकिलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

पुणे एसीबीच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या समोरच रविवारी दुपारी ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (53) आणि अ‍ॅड. मधुकर विठ्ठल कोरडे (35 रा. मिरजगाव, ता. कर्जत) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका 41 वर्षांच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना धडक देणार्‍या वाहनाच्या इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अ‍ॅड. मधुकर कोरडे यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले.

एसीबीच्या अधिकार्‍यांनी 15 व 16 ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. यानंतर पथकाने रविवारी भिगवण पोलीस स्टेशनसमोर सापळा रचला. अ‍ॅड. कोरडे यांना पोलीस उपनिरीक्षक लोकरे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. भिगवण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com