करंजी बारा दिवसांपासून अंधारात

स्ट्रीट लाईटचे वीज बिल थकले : ग्रामस्थांमधून संताप
करंजी बारा दिवसांपासून अंधारात

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावातील स्ट्रीट लाईटचे 40 लाख रुपये

वीज बिल थकल्यामुळे गावातील स्ट्रीट लाईट 12 दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे करोना संकटात आणखी एका संकटाची भर पडली आहे. गावातील स्ट्रीट लाईट गेल्या 12 दिवसांपासून बंद असल्याने गावातील महिलांना सायंकाळनंतर पिठाच्या गिरणीत, किराणा दुकानात जाणे देखील मुश्कील झाले आहे. तसेच वयोवृद्धांचे देखील सायंकाळचा फेरफटका बंद झाला आहे.

आठ दिवसांपूर्वीच राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे करंजी गावाच्या दौर्‍यावर आले असता, ग्रामस्थांनी गावची स्ट्रीट लाईट बंद असल्याचे त्यांच्या कानावर घातले. त्यांनी लगेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून अवघे 30 हजार रुपये भरा, तुमची लगेच लाईट चालू करून देण्याचे सांगतो, असे सांगितले होते.

त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी 30 हजार रुपये भरण्यास होकार दिला, असे असताना देखील ग्रामपंचायतीला गेल्या आठ दिवसापासून तीस हजार रुपये भरायला महावितरणकडे वेळ न मिळाल्यामुळे करंजी गावची स्ट्रीट लाईट अजून बंद असून गाव अंधारात आहे.

करंजी गावठाणसह थोरलामळा, लक्ष्मीवाडी या तीन भागांची मिळून सुमारे 40 लाख रुपये विजेची थकबाकी आहे. त्या थकबाकीमुळे गावची स्ट्रीट लाईट बंद करण्यात आली आहे.

- भाऊ अकोलकर, वीज कर्मचारी.

करंजी सारख्या महामार्गावर असणार्‍या गावची स्ट्रीट लाईट बंद असल्याने गाव अंधारात आहे. गावात सत्ताधार्‍यांना जाब विचारणारे कोणी राहिले नाही. सत्ताधारी आणि विरोधकांची छुपी युती झाल्यामुळे ग्रामस्थ हतबल आहेत विरोधक सक्षम असले की असे प्रश्न निर्माण होत नाहीत.

- छानराज क्षेत्रे, सामाजिक कार्यकर्ते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com