धक्कादायक ! करंजीत भगरीच्या पिठाची भाकर खाल्ल्याने पंधरा जणांना विषबाधा

धक्कादायक ! करंजीत भगरीच्या पिठाची भाकर खाल्ल्याने पंधरा जणांना विषबाधा

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गावातील अनेक महिला पुरुषांनी नवरात्रीचे उपवास धरले आहेत. उपवासाच्या पहिल्याच दिवशी गावातील काही महिलांनी करंजी येथील एका किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणून रात्री या पिठापासून भाकरी तयार केल्या. त्या भाकरी खाल्ल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही लोकांना उलट्या, जुलाब होऊ लागल्याने त्यांना घरातील इतर मंडळींनी तात्काळ तिसगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

या भगरीच्या पिठामुळे करंजीसह खंडोबावाडी, मराठवाडी येथे देखील काही लोकांना त्रास झाला असून काहींवर नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर करंजी येथील प्रकाश गोवर्धन राठोड, लिलाबाई लक्ष्मण चव्हाण, अनिता प्रकाश राठोड, रामदास रावजी चव्हाण, गीताबाई रामदास चव्हाण, अशोक तारू चव्हाण, सुशीला अशोक चव्हाण, रमेश संतोष चव्हाण या आठ लोकांना तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

अन्नातून फूड पॉइजनिंग झाल्यामुळे काल रात्री करंजी येथील आठ व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत त्यांना डीस्चार्ज दिला जाईल.

- डॉ. गणेश साळुंखे / डॉ. वैशाली शिरसागर

करंजी येथील दहा ते पंधरा लोकांना भगरीच्या पिठापासुन केलेल्या भाकरी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असून ज्या कंपनीने हे पीठ तयार केले आहे. त्या कंपनीचा शोध घेऊन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करून संबंधित रुग्णांना न्याय मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश शेलार, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, माजी सरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, राजेंद्र क्षेत्रे, पैलवान नामदेव मुखेकर, माजी चेअरमन उत्तम अकोलकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष सुभाष अकोलकर यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com