करंजीजवळ भिषण अपघातात चार ठार

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर : दोन वाहनांची समोरासमोर धडक
करंजीजवळ भिषण अपघातात चार ठार

करंजी |वार्ताहर| Karanji

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर करंजी (ता. पाथर्डी) गावाजवळ रविवारी पहाटे दोनच्या सुमारास

सेन्ट्रो कार व ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये सेंट्रो कार मधील चौघांचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय मार्गावरील करंजी गावाजवळ रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास परभणीहून पुण्याकडे जात असलेली सेन्ट्रो कार क्रमांक एम.एच. 12 सीडी 2917 व पुण्याहून नांदेडकडे भरधाव वेगाने जात असलेली ट्रॅव्हल्स एम.एच.38 एक्स 8555 या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील केशव विलास बोर्‍हाडे (वय 25, रा. मंठा, जालना), परमेश्वर लक्ष्मण काळे (वय 40 रा धामणगाव परभणी), बाबासाहेब शंकर कदम (वय 60, (रा. जायगाव बीड) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या सोबतचे विनोद धावणे पूर्ण नाव माहीत नाही, यांना पाथर्डी येथे रुग्णालयात नेल्यानंतर त्याठिकाणी त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशी मात्र या अपघातातून सुखरूप बचावले असून ट्रॅव्हलचा चालक मात्र अपघातानंतर तेथून फरार झाला आहे.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे परिसरात मोठा आवाज झाला. यावेळी अनिल पालवे, रमेश क्षेत्रे, प्रमोद क्षेत्रे यांच्यासह आजूबाजूचे नागरिक महामार्गाच्या दिशेने धावून आले व अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून घेत पाथर्डीला पाठवण्यात आले. करंजी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला असून या अपघातात मयत झालेले लोक सोयरीकीसाठी परभणीकडे नातेवाईकांकडे गेले होते.

तेथून परत माघारी पुण्याकडे निघाले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे नगरपासून पाथर्डी पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून हे काम अत्यंत संथ गतीने चार वर्षांपासून सुरू आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी देखील पुर्वीच्या ठेकेदाराने काम केल्यानंतर काही दिवसांतच मोठा खड्डा पडला आणि तो खड्डा चुकवताना हा अपघात घडला की काय ? असा प्रश्न आहे.

अपघात घडल्यानंतर महामार्ग पोलीस विभागाचे एपीआय गिरी, एएसआय गोल्हार, कराड, पोटे, कांबळे, आव्हाड यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी परमेश्वर जावळे व कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे चुकवताना अनेक लहान मोठ्या वाहनांचा अपघात होत असून आतापर्यंत या महामार्गावर दीडशेहून अधिक जणांचा या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

महामार्गावर नगरपासून पाथर्डीपर्यंत पडलेले मोठे खड्डे आणि अनेक दिवसांपासून महामार्गाचे काम रखडल्यामुळे अपघात वाढत असून रविवारी रात्री झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेल्याने संबंधित ठेकेदार व महामार्गाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुकुंद गर्जे यांनी केली आहे.

तसेच पूर्वीचा आणि आत्ताचा दोन्ही ठेकेदार एकाच माळेचे मणी असून ठेकेदाराला महामार्गाचे अधिकारी पाठीशी घालत असून धोकादायक वळण आहे. ते तसेच ठेवून थातूरमातूर पध्दतीने काम उरकते घेण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा छानराज क्षेत्रे यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com