पशुपालन व्यवसायासाठी जिल्हा बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार : ससाणे
सार्वमत

पशुपालन व्यवसायासाठी जिल्हा बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार : ससाणे

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, पक्षीपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी मेंढी पालन याकरिता खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत मंजुरी दिली असल्याने पशुपालन व्यवसायासाठी जिल्हा बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार आहे.

प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे दहा गायींकरिता दीड लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला असल्याची माहिती संचालक करण ससाणे यांनी दिली.

ज्या ज्यावेळी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्या त्यावेळी जिल्हा बँक शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. सध्या करोनामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने शेतकर्‍यांना वेळोवेळी आधार देण्याचे काम जिल्हा सहकारी बँकेने केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पशुपालन संबंधी केंद्र शासनाने तालुका दूध उत्पादक संघाच्या सभासदांना रुपे किसान के्रडीट कार्ड व खेळते भांडवल कर्जवाटप संबंधी 1 जून ते 31 जुलै दरम्यान अभियान राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाली असून त्याबाबत सहकारी संघांना मा. विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध) यांनी अभियान राबविण्याचे कळविले आहे.

त्यानुसार दूध उत्पादक सभासदांचे कर्ज तालुका दूध उत्पादक संघाकडून गोळा केले जाणार आहे. सदर दूध उत्पादक सेवा संस्थेच्या सभासद असणे गरजेचे आहे. सदर खेळते भांडवल कर्ज वाटप कार्यक्रम 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत राहील. तसेच वसुलाची अंतिम मुदत 31 मार्च राहील. सदर कर्जाचा व्याजदर हा 7 टक्के राहणार असल्याचे ससाणे यांनी सांगितले.

करोनासारख्या महाभयंकर महामारीमुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला असून त्यामुळे अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेने केला आहे. दूध उत्त्पादक सभासदांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच याकरिता काही अडचण असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com