ससाणेंच्या फराळाला मुरकुटे व खा. लोखंडेंची हजेरी !

ससाणेंच्या फराळाला मुरकुटे व खा. लोखंडेंची हजेरी !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अनेक वर्षे कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावलेले मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काल उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या फराळाची ‘गोड’ चर्चा शहरात सुरू झाली आहे.

माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष तालुक्याने जवळून पाहिला आहे. कार्यकर्त्यांनी त्याचा चांगलाच अनुभही घेतला आहे. ससाणे-मुरकुटे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून ससाणे-मुरकुटे यांच्यातील संघर्ष हळूहळू मावळताना पहायला मिळत आहे. आगाशे कट्ट्यावर ससाणे-समर्थकांमधील मैत्रीचा धागा बांधला गेला.

त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून या नव्या मैत्रीची रेशिमगाठ बांधली. त्यावेळीही मुरकुटे व ससाणे यांनी एकमेकांना पेढा भरवला. त्या पेढ्याची गोडी अजूनही टिकून असल्याचा अनुभव काल दिवाळी फराळाच्या निमित्ताने आला.

दरम्यान नगरपरिषद निवडणुकीत ससाणे-मुरकुटे एकत्र येणार? अशी चर्चा रंगली असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काम करण्याचा निरोप श्री. मुरकुटे यांना पाठविला. त्यामुळे मुरकुटे काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले असताना काल सकाळी माजी आ. भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू निरज सिध्दार्थ मुरकुटे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे आ. लहू कानडे यांच्यासोबत येणार्‍यांचे स्वागत करण्यासही काही वेळ माजी आ. मुरकुटे उभे राहिले. दुपारी मुळा-प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे आपल्या कार्यकर्त्यांसह सुयोग मंगल कार्यालयातील फराळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. करण ससाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

ससाणे यांच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही हजेरी लावली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समवेत त्यांनीही फराळाचा आस्वाद घेतला. माजी आमदार भानुदास मुरकुटे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या हजेरीची काल दिवसभर शहरात खमंग चर्चा सुरु होती. त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर फिरत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com