कापडबाजारात तीन दुकाने फोडली

सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास
कापडबाजारात तीन दुकाने फोडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी अडीच लाख रूपयांच्या रोख रकमेसह शूज, सॉक्स, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह असा एकूण दोन लाख 64 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी प्रसन्न राजकुमार मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

शुक्रवारी रात्री नगर शहरासह उपनगरात दहीहंडीचा जल्लोष होता. बहुतांश पोलीस कर्मचारी या बंदोबस्तात होते. याचीच संधी साधत चोरट्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापडबाजारात तीन दुकानांमध्ये चोरी केली. मुथा ड्रेसेस, मुथा कलेक्शन व चरण शूज या दुकानांमधून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. मुथा कलेक्शन येथून दोन लाख, मुथा ड्रेसेस येथून 45 हजार व चरण फूट वेअर येथून आठ हजार रूपये रोख, तसे तिन्ही दुकानातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, शूज, सॉक्स असा दोन लाख 64 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. दुकानाचे सिक्युरिटी डोअर व डिजिटल लॉकर तोडून रोख रक्कम पळविण्यात आली आहे.

दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. या घटनेसंदर्भात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी - आ. जगताप

कापड बाजार हा व्यवसायाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. चोरांनी कापड बाजारातली दुकाने फोडून धाडसी चोरी केली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्यापार्‍यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी तातडीने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गस्त वाढवावी त्याचबरोबर झालेल्या चोरीचा तपास तातडीने मार्गी लावावा. चोरांवर पोलिसांनी वचक निर्माण करावा, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com