कनगरला मुरूम वाहतूक करणार्‍या डंपरखाली मुलगा ठार
सार्वमत

कनगरला मुरूम वाहतूक करणार्‍या डंपरखाली मुलगा ठार

Arvind Arkhade

राहुरी|तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील कनगर येथे मुरूम वाहणार्‍या डंपरने (क्रमांक एमएच 16 एई 5919) पाठीमागून धडक दिल्याने डंपरखाली सापडून काल 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता माठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

दरम्यान, डंपरचालक अंकुश माळी व मालक ऋषिकेश रावसाहेब भुजाडी यांच्याविरोधात रेवणनाथ साईराम उर्‍हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304, 279, 337, 338, 309 व वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून डंपर व एक जेसीबी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कनगर येथील बबन साइराम उर्‍हे (वय वर्ष 32) हे काल आपल्या आठ वर्षाचा मुलगा कार्तिक यास सकाळी कनगर गावातून उंबरदरा भागात असलेल्या आपल्या घरी जात असताना कार भागातून मुरूम भरून आलेल्या डंपरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात आठ वर्षीय कार्तिक हा जागीच ठार झाला. तर त्याचे वडील बबन उर्‍हे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाला पांगवून चिमुरड्या कार्तिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

राहुरी तालुक्यात सर्वत्र अवैध मुरूम उत्खनन सुरू असून याकडे महसूल विभाग कानाडोळा करीत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कनगरच्या संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com