कानडगावला अवैध गौणखनिज वाहतुकीची साधने अडविली
सार्वमत

कानडगावला अवैध गौणखनिज वाहतुकीची साधने अडविली

बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Arvind Arkhade

कानडगाव|वार्ताहर|Kandgav

राहुरी तालुक्यातील कानडगांव शिवारातून अनधिकृतरित्या मुरूमाची वाहतूक रात्रंदिवस खुलेआम सुरू आहे. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून गौणखनिजाची लूट करणार्‍या तस्करांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी ट्रॅक्टर अडवून केली आहे. मुरूम उत्खननाचे ट्रॅक्टर सुरू राहिल्यास वाहने अडवून त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

कानडगांव शिवारातून गेल्या अनेक दिवसांपासून मुरूमाची अवैधरित्या वाहतूक सुरू आहे. दररोज कानडगांव ते सोनगांव रस्त्याने सुमारे 20 ते 25 वाहने मुरूमाची वाहतूक करताना बेफान वेगाने धावतात. त्यामुळे परिसरातील रस्त्याच्या नजिक राहणारे नागरिक जीव मुठीत धरून राहतात.

यातील काही वाहनचालक मद्यपान करून बेफाम वेगाने वाहने चालवित असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कानडगांव ते सोनगांव हा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे. यामुळे नागरिकांनी मुरूमाची ट्रॅक्टर अडवून तहसीलदार यांना फोन केला असता त्यांनी कनगर येथे असल्याने येण्यास असमर्थता दर्शविली. तसेच कानडगांवचे तलाठी व कोतवाल यांनी फोन बंद करून ठेवले.

कानडगांवचे तलाठी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून व मोठी आर्थिक तडजोड करून हे मुरूम उत्खनन चालू आहे. यामुळे तलाठी व कर्मचार्‍यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हााधिकारी व महसूलमंत्री यांना ई-मेलने केली आहे.

मुरूम उत्खनन करणारे माफिया प्रशासनाला दोन ते चार ट्रॅक्टरची रॉयल्टी भरतात व अनेक ट्रॅक्टर मुरूमाची चोरी करतात. अवैध उत्खननाकडे महसूल विभाग कानाडोळा करीत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तलाठी व महसूल कर्मचार्‍यांवर कारवाई करावी व यापुुढे मुरूमाचे उत्खनन झाल्यास तलाठी व कार्यालयाचे कर्मचारी यास जबाबदार धरून कारवाई करावी.

तलाठी कार्यालयाच्या आशिर्वादाने मुरूम उपसा होत असून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कमेची तडजोड केली जाते. याची चौकशी करून कारवाई करावी, कनगरसारखी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार महसूल प्रशासन असेल.

ग्रामस्थ कानडगांव

Deshdoot
www.deshdoot.com