
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे 18 फेब्रुवारी रोजी रात्री शेरखान पीर मंदिरातील दानपेटी चोरीच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न करताना आरोपी सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाला असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रशिद अब्दुलकरीम सय्यद (वय 67) रा. कानडगाव, ता. राहुरी हे गावातील शेर खान पीर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. 19 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रशिद सय्यद व त्यांच्याबरोबर इतर काही लोक कानडगाव येथील कब्रस्थान मध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले व तेथे प्रार्थना करून, कब्रस्थान शेजारी असलेल्या शेर खान पीर मंदिरात दर्शनासाठी गेले. तेव्हा त्यांना मंदिराच्या भांडाराच्या खोलीच्या दरवाजास लावलेले कुलूप तुटलेले दिसले. त्यांना संशय आल्याने त्यांनी मंदिरासमोर ठेवण्यात आलेली दानपेटी पाहिली असता पेटीस लावण्यात आलेले कुलूप चेमटलेले दिसले.
त्यांनी मंदिरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते रात्री दहा वाजे दरम्यान गिताराम शिंदे याने मंदिरा मधील भांडाराच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यामधून लोखंडी टिकाव व कुर्हाडीच्या सहाय्याने मंदिरा समोर ठेवण्यात आलेली लोखंडी दान पेटीचे कुलूप तोडू लागला. परंतु त्यास दान पेटीचे कुलूप तुटले नाही. म्हणून तो लोखंडी टिकाव व कुर्हाड मंदिरा समोर टाकून निघून गेला असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
रशिद अब्दुलकरीम सय्यद यांच्या फिर्यादीवरून आरोपी गिताराम गंगाराम शिंदे, रा. निंभेरे ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 207/2023 भादंवि कलम 379, 511 प्रमाणे चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.