
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे अडीच महिन्यांपूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या शाखेच्या(एलसीबी) पथकाने सहा दरोडेखोरांना अटक केली असून, इतर तीन आरोपींचा शोध सुरूआहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या क्राईम मिटिंगमध्ये या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्याकडे सोपविला होता. शोएब दाऊद शेख (वय 25,रा. कानडगाव, ता. राहरी), गॅसउद्दीन ऊर्फ गॅस रजा उल्लावारसी (वय 21), नफीस रफीक सय्यद (वय 23, दोघेरा. सिडको, जि. नाशिक), अश्पाक ऊर्फ मुन्ना रफीक पटेल (वय 21), शेखर राजेंद्र शिंदे (वय 24, दोघे रा. कोल्हार ता. राहाता), मंगेश बबनराव पवार (वय 32, रा. इंदिरानगर,श्रीरामपूर) अशी अटक केलेल्य दरोडेखोरांची नावे आहेत.
कानडगाव येथील विक्रम संजय मोताळे यांच्या घरावर 18 मे रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. मोताळे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना चेहर्यावर रुमाल बांधून आलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी गावठी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून मारहाण करत सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा 65 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एलसीबी पथकाने आरोपींचा पेहराव, बोलण्याची पद्धत या बाबींची माहिती घेतली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कारचा, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून शोएब दाऊद शेख या संशयिताला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांबद्दल माहिती दिली. नंतर पाच आरोपींना एलसीबीनेअटक केली.
या घटनेचा राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहेत. उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, शिपाई शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर, अरुण मोरे यांनी ही कामगिरी केली. अटक केलेले पाच आरोपीपोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईतगुन्हेगार आहेत. शोहेब दाऊद शेख याच्यावर नगर जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा, मंगेश पवारवर नगर व बीड जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण असे तीन गुन्हे दाखल आहेत. सद्दाम शेखवर नगरजिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा, गॅसुद्दीन वारसीवर नगर जिल्ह्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.