कानडे-ससाणे गट मनोमिलनाच्या वृत्ताने ‘रुसवे-फुगवे’ वाढले

निर्णय प्रक्रियेत डावलल्याची ससाणे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची भावना
कानडे-ससाणे गट मनोमिलनाच्या वृत्ताने ‘रुसवे-फुगवे’ वाढले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस अंतर्गत आ. लहू कानडे व ससाणे गटातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आलेला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी या दोन्ही गटाचे मनोमिलन घडविल्याचे वृत्त प्रसिध्द होताच श्रीरामपुरात ससाणे गटातील ‘रुसवे-फुगवे’ वाढले आहेत. एवढेच नव्हे तर निर्णय प्रक्रियेत आम्हाला डावलल्याची भावनाही काही प्रमुख कार्यकर्ते जाहीरपणे व्यक्त करु लागले आहेत.

आ. लहू कानडे कोणताही कार्यक्रम ठरविताना ससाणे गटाला विश्वासात घेत नाहीत. तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणूक निकालानंतर ससाणे गटाशी फारकत घेऊन विरोधी आदिक गटाला पाठबळ देणारे अंजुम शेख यांच्या गटाशी आ. कानडे यांनी साधलेली जवळीक तर ससाणे गटाने माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याशी केलेली युती हे प्रमुख मुद्दे आ. कानडे- ससाणे गटातील वादाचे कारण ठरले. त्यात काँग्रेस शहर व तालुका अध्यक्ष निवड प्रक्रियेत दोन्ही गटाने आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून या वादाच्या आगीत तेल ओतले. त्याची पुनरावृत्ती शहर युवक काँग्रेस पदाधिकारी निवड प्रक्रियेत झाली. आ. कानडे गटाने अभिजित लिप्टे यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्षांकडून आणले तर ससाणे गटाने राष्ट्रीय व प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून रितेश चव्हाणके यांच्या नावाची निवड जाहीर केली.

डॉ. सुधीर तांबे यांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने हा वाद काँगे्रस विधीमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्यासमोर गेला. कानडे- ससाणे वाद मिटविण्यासाठी संगमनेरात अनेक बैठकाही झाल्या. पण दोन्ही गट आपापल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने हा वाद मिटत नव्हता.

गेल्या आठवड्यात आ. थोरात यांनी आ. लहू कानडे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांना एकत्र बसवून हा वाद संघटनेच्यादृष्टीने मिटविणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आगामी निवडणुकीत त्याची किंमत पक्षाला मोजावी लागेल. वादाचे मुद्दे बाजुला ठेवून एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.

या भेटीचे वृत्त समजताच ससाणे गटातील प्रमुख कार्यकर्ते नाराज झाले. यापूर्वी संघटनेत कोणताही निर्णय घ्यायचा असेल प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनीमय केला जात होता. माजी आ. स्व. जयंत ससाणे यांच्या काळातील ही परंपरा त्यांच्यानंतर करण ससाणे यांनीही सुरु ठेवली आहे. मात्र संगमनेरच्या भेटीच्या वेळी ही परंपरा मोडीत निघाल्याचा आरोप संघटनेतील प्रमुख कार्यकर्ते करत आहेत. एवढेच नव्हे तर आम्ही स्व. जयंतराव ससाणे यांना मानणारे सच्चे कार्यकर्ते आहोत, असे असताना आम्हाला निर्णय प्रक्रियेत डावलणे योग्य नाही, अशी खंतही या कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सार्वमतशी बोलताना व्यक्त केली. आता ससाणे गटातील हे ‘रुसवे-फुगवे’ दूर करण्याचे नवीन आव्हान नेत्यांपुढे ठाकले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com