कामिका एकादशीनिमित्त पुणतांब्यात लाखो भाविक

महंत रामगिरी : भक्ती मार्ग हा सुळावरची पोळी, कोकमठाणकरांनी स्विकारला सप्ताहाचा नारळ
कामिका एकादशीनिमित्त पुणतांब्यात लाखो भाविक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे आषाढ महिन्यातील कामिका एकादशीनिमित्त काल भरलेल्या यात्रेत अंदाजे दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी महान योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

करोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे आषाढी एकादशीची यात्रा भरली नव्हती. त्यामुळे काल भरलेल्या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विशेष म्हणजे यात्रेनिमित्त शुक्रवार दुपारपासून भाविक पायी दिंडीने मोठ्या संख्येने पुणतांब्याकडे मार्गस्थ झाले होते. पवित्र गोदावरी नदीपात्रात गंगास्नानाचा लाभ घेऊन भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान पुणतांबा गावात प्रथमच सीए परिक्षेत सुयश प्राप्त केलेल्या हर्षवर्धन विलास बोर्डे यांच्याहस्ते योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीची विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी हर्षवर्धन याचे आई वडिल तसेच देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण, पंकज गुरू सह मोजकेच मान्यवर उपस्थित होते. महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना उघडे करण्यात आले.

रात्री 12 वाजेनंतर भाविकांनी दर्शन बारीमध्ये रांगा लावल्या होत्या. सकाळी 6 नंतर तर दर्शन बारीत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येथील गोदावरी नदीपात्रात गंगास्नान केल्यानंतर महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी योगीराज चांगदेव महाराज देवस्थान मार्फत दोन खोल्या उपलबध करून दिल्या होत्या.

भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून अनिरुद्ध अ‍ॅकेडमीचे 60 पेक्षा जास्त स्वयं सेवक काल सकाळपासून अथक परिश्रम करताना दिसून येत होते. तसेच पोलीस प्रशासनाचे सर्व पोलीसही मंदिराच्या प्रवेशद्वार तसेच यात्रेत अनेक ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेत होते. काल सकाळपासून पुणतांब्यात वरुणराजाने अधूनमधून हजेरी लावली होती. मात्र भरपावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

दुपारी 1 वाजेच्या दरम्यान सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे हरिकीर्तन सुरू झाले. एक तासाच्या किर्तनात महाराजांनी भक्तीमार्गाचे महत्त्व पटवून दिले. संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये भक्ती मार्ग सोपा आहे तसेच तो कठिण आहे असे स्पष्ट केले. मात्र महाराज एकाच वेळी सोपा व कठिण आहे असे म्हणतात याची कारणीमिमांसा महंतांनी भाविकांना सोप्या शब्दांत समजावून सांगितली. सर्व साधनांमध्ये भक्ती मार्गाची साधना चांगली असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

यावेळी महंताचे हस्ते कोकमठाण येथे येत्या 2 ऑगष्ट रोजी सुरु होणार्‍या मंहत गंगागिरी महाराज यांच्या नावाने सुरू होणार्‍या 175 व्या अखंड नाम सप्ताहाची औपचारिक घोषणा करून त्याचा नारळ कोकमठाण येथील सप्ताह समितीला सुपूर्द केला. तसेच यावेळी 176 व्या नामसप्ताहाची मागणी पुणतांबा, निर्मळ पिंपरी, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव, येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी केल्याचे रामगिरी महाराज यांनी सांगितले.

यावेळी संजीवनी कारखान्याचे नवानिर्वाचित चेअरमन विवेक कोल्हे, सुधाकर रोहोम, संभाजी रक्ताटे, शरद थोरात, रंगनाथ लोंढे, मधु महाराज तसेच पुणतांब्याचे सरपंच डॉ. धंनजय धनवटे, पुणतांबा विकास आघाडीचे धनंजय जाधव, सुधाकर जाधव, प्रताप वहाडणे, डॉ. विजय कोते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन मुठे, विजय धनवटे, दिनकरराव भोरकडे, बंडू साबळे, भास्करराव चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. आर. बखळे, नाना गव्हाणे, भोला उदावंत सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विवेक कोल्हे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी स्थानिक विकास निधीतून अंदाजे 25 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या सभागृहाचा आर्वजून उल्लेख केला. तसेच पुणतांबा परिसराच्या विकासासाठी केलेल्या योगदानाची आठवण करून दिली. श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मंदिराकडे येणार्‍या रस्त्याचे भाविकांच्या सोयीसाठी रुंदीकरण करून डांबरीकरण करावे, असे आवाहन त्यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना केले.

कीर्तन संपल्यानंतर चांगदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. तसेच समाधी परिसरातील सर्व मंदिरे तसेच येथील मुक्ताई झानपीठात मुक्ताई मंदिरात भाविकांनी रांग लावल्या होत्या. महंत रामानंदगिरी महाराज यांची प्रकृती ठिक नसल्याचे भाविकांना समजल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक मुक्ताई ज्ञानपीठात जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन प्रकृतीची आस्थेने चौकशी करत होते. यावेळी उत्तम महाराज गाडे भाविकांना योग्य माहिती देऊन मार्गदर्शन करत होते. त्यातच अडीच वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यात्रेत काही काळ विस्कळीतपणा आला.

रेल्वे फाटकापासून चांगदेव महाराज मंदिराकडे येणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. रेल्वे फाटकाच्या ठिकाणी पोलीस यंत्रेणेने पुढाकार घेऊन मंदिराकडून येणारी वाहतूक डाव्या बाजूने वळविली. मात्र येथील कान्हेगाव खळ्याजवळ असलेल्या रिकाम्या जागेत पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे अनेक चारचाकी वाहने फसली. त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ कोंडी झाली. त्यातच रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी व पाऊस यामुळे अनेक भाविकांना दर्शनासाठी मंदिराकडे जाणे अवघड झाल्यामुळे अनेक भाविक रेल्वे फाटकापासून श्रीरामपूरकडे दर्शन न घेता माघारी फिरले.

रेल्वे फाटकापासून चांगदेव मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर नेहमीच होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे काल सायकांळी 6 वाजेपर्यंत त्रस्त झाले होते. यात्रेनिमित श्रीरामपूर, कोपरगाव तसेच राहाता, वैजापूर येथून मोठ्या संख्येने भाविक पायी दिंडीने दर्शनासाठी आले होते. विविध ठिकाणांहून अंदाजे 140 पर्यंत पायी दिंड्या दाखल झाल्याचे देवस्थानचे विश्वस्त श्री. मुरुदगण यांनी सांगितले. दिंडीने येणार्‍या भाविकांसाठी प्रत्येक गावात तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थांनी चहा तसेच फराळाचे साहित्य देऊन सोय केली होती.

पुणतांबा येथील स्टेशन रोडजवळ असलेल्या शिवाजी चौकात येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे चेअरमन सुभाष वहाडणे व त्यांच्या सहकार्‍यांनी भाविकांना फराळाची व्यवस्था केली. कोपरगाव व श्रीरामपूर आगारामार्फत भाविकांची ने-आण करण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेनिमित मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या पश्चिम बाजूस खासगी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र बर्‍याच जणांनी मनमानी करून ज्यादा पैसे आकारणी केल्याच्या काही घटना घडल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महंत रामागिरी महाराज यांचे कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी स्टेजवर गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा साधून पाकीटमारांनी अनेकांना आपला हिसका दाखविला. यात्रेनिमित मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. दुकानांमध्येही खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. काल रात्री 9 वाजेपर्यंतही भाविकांची मंदिराकडे रिघ सुरुच होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com