
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्वाच्या असलेल्या टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे कमालपूर येथील आरोग्य उपकेंद्राचेच आरोग्य सध्या बिघडले आहे. आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला वेड्या बाभळीच्या काटेरी झुडुपांनी विळखा मारल्याने आरोग्य सेवा देणार्या या उपकेंद्राचा श्वास कोंडला आहे.
ग्रामिण भागातील रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे विस्तारीकरण करुन आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत टाकळीभान, कमालपूर, भोकर व खिर्डी-वांगी असे चार उपकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना टाकळीभान आरोग्य केंद्रापर्यंत येण्याचा वेळ वाचून तात्काळ उपचार मिळतात. मात्र कमालपूर या मोठ्या तिर्थक्षेत्राच्या व राजकीय उंची असलेल्या गावातील आरोग्य उपकेंद्राचेच आरोग्य सध्या बिघडले आहे.
आरोग्य उपकेंद्राच्या भव्य इमारतीला वेड्या बाभळीच्या काटेरी झुडुपांनी विळखा घातल्याने या आरोग्य उपकेंद्राचा श्वास कोंडला गेला आहे. तर रुग्णांना काटवनातून वाट काढत उपकेंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा देणार्या या आरोग्य उपकेंद्राकडे आरोग्य विभाग कधी लक्ष देणार? असा सवाल आता रुग्ण व नागरिकांकडून विचारला जात आहे.