महामार्गाच्या कामासाठी पाथर्डीत भीक मांगो आंदोलन

वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाचा निषेध
महामार्गाच्या कामासाठी पाथर्डीत भीक मांगो आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुका हद्दीतून जात असलेल्या कल्याण- विशाखापट्टणम ( निर्मल) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रचंड खड्डे व धुळीच्या साम्राज्यामुळे हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रशासनाचा जाहीर निषेध करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी उपविभागीय कार्यालयाच्या उपअभियंता स्मिता पवार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील कसबा येथील पोळा मारूती मंदिरापासून आज सकाळी पोतराजाला साज घालून वाजत गाजत घोषणा देत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के महिला तालुकाध्यक्ष रोहिणी ठोंबे आदींनी केले. रस्त्याच्या बाजुला असणार्‍या दुकानदारांसह नागरिकांकडून पैशाच्या रूपात भीक मागण्यात आली. जुन्या बसस्थानक परिसरातील स्व.वसंतराव नाईक चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी अरविंद सोनटक्के, वंचितच्या महिला तालुकाध्यक्षा रोहिणी ठोंबे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे पाथर्डी शहराधिकारी सचिन नागापुरे, युवक काँग्रेसचे महेश दौंड, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव मर्दाने आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत प्रशासन, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका केली. राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी उपविभागीय कार्यालयाच्या उपअभियंता स्मिता पवार यांनी आंदोलनाला सामोरे जाऊन राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याबाबत वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय होणार असून डिसेंबरमध्येच रस्त्याच्या कामाला वेगाने व पूर्ण क्षमतेने सुरुवात होऊन रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल असे अश्वासन दिले.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात राजू पठाण, सुनील जाधव, सोपान भिंगारदिवे, सोपान बिडवे, इरफान शेख, किशन फतपुरे, सलीम मनियार, मनिष उबाळे, सुरेश हुलजुते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

पाचशे ऐंशीची भीक जमा

भीक मांगो आंदोलनात नागरिकांकडून 580 रुपये रोख स्वरूपात जमा झालेली भीक स्वरूपातील रक्कम आंदोलकांनी उपअभियंता स्मिता पवार यांना स्विकारण्याचा आग्रह केला.मात्र पवार यांनी ही रक्कम ठेकेदाराला द्या असे सांगून स्वीकारण्यास नाकार दिला. त्यावर मनिऑर्डरने प्रशासनाला पाठवून देऊ असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com