महामार्गासाठी वाढीव 10 कोटीचा निधी मिळणार - खा. विखे पाटील

पाथर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती
महामार्गासाठी वाढीव 10 कोटीचा निधी मिळणार - खा. विखे पाटील

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कल्याण -निर्मल विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गासाठी अतिरिक्त वाढीव दहा कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपलब्ध करून देणार आहेत. भुसंपादनाचा मोबदला तातडीने देऊन व इतर तांत्रिक अडचणी दुर करुन हा रस्ता सहा महिन्यात पुर्ण केला जाईल असे अश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले.

डॉ.सुजय विखे यांनी आज या रस्त्याची नगर तालुक्यातील मेहेकरी पासुन विविध ठिकाणी थांबून पाहणी करुन अडचणी समजून घेत त्या तातडीने सोडवण्यासाठी आदेश दिले. यानंतर पाथर्डी येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत तेे बोलत होते. खा. विखे म्हणाले, हा महामार्गाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे.विविध ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले. मेहेकरी फाटा ते फुंदेटाकळी पर्यंतच्या 55 किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे,खोदकाम, पुलाची कामे अर्धवट पडली आहेत.

अनेक आंदोलने झाली.निवडणूक काळात या महामार्गाचे आश्वासन दिले होते. ते काम अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त करत दिलगीरी व्यक्त केली. नगरमधील उड्डाणपूल, कोरोना व इतर कारणास्तव दिरंगाई झाल्याचे मान्य करत खा.डॉ.विखे म्हणाले,यापूर्वीचा मंजूर 68 कोटी रुपयांचा निधी पूर्ण खर्च झाल्याशिवाय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेले दहा कोटी रुपये मिळणार नाही.त्यामुळे आहे तो रस्ता पुर्ण करु. या सर्व प्रक्रियेत व आतापर्यंत आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,पालिकेतील पदाधिकार्‍यांनी चांगले सहकार्य केल्याचे खा.डॉ.विखे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक रमेश गोरे,माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, अजय रक्ताटे,अ‍ॅड.प्रतिक खेडकर,दत्ता बड़े यांच्यासह महामार्गाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अडवणुक केल्यास गुन्हे

या मार्गासाठी संपादित जमीनीचा मोबदला साडेसहा कोटी रुपये देण्याचे काम जानेवारी महिन्यात पुर्ण केले जाईल. इतर अतिक्रमणे व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन रस्ता पुर्ण करु. मोबदला दिल्यानंतर अडवणूक केली तर मात्र नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील.तांत्रिक अडचण व इतर सबब खपवुन घेतली जाणार नाही. असा इशाराही खा. विखे यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com