कळसूबाईच्या वनश्रीत भरला रानभाज्या महोत्सव
सार्वमत

कळसूबाईच्या वनश्रीत भरला रानभाज्या महोत्सव

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईच्या वनश्रीत नुकताच कृषी विभागाचा रानभाज्या महोत्सव भरविण्यात आला होता. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात अनेकांनी रानभाज्या खाण्याचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषीअधिकारी सुधाकर बोराळे होते. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सेंद्रिय शेती घटाचे अध्यक्ष संपत वाकचौरे, सरपंच वैशाली दराने, बाळू घोडे, पोपट घोडे, बारी कृषी सहाय्यक मंगल ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून औषधी वनस्पती अभ्यासक व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे तालुका अध्यक्ष रामलाल हासे उपस्थित होते.

सर्व रानभाज्यांचा अभ्यास माहिती घेऊन आपण रोजच्या आहारात त्यांचा वापर करून आपले आरोग्य विविध आजारांपासून दूर ठेवून निरोगी बनवावे असे आवाहन हासे यांनी केले.रानभाज्या मानवी आरोग्यास वरदान आहेत. रानभाज्यांतील ऊर्जा मानवाला तंदुरुस्त बनवितात आणि बाळसेदार भाज्या माणसांना आजार वाढवतात. याचे भान आज मानवाला काळानेच करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी रानभाज्यामध्ये जे गट लागवडीपासून मार्केटपर्यंत काम करून एखाद्या रान भाजीच्या वाहनाचा प्रसार करतील त्यांना पुढील वर्षी आपण अशाच महोत्सवात सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करू, असे सांगितले.

तसेच चंदन शेती प्रचारक रमाकांत डेरे यांनी रानभाज्यांचे महत्त्व सांगितले. तसेच कळसूबाई गटाचे बाळू घोडे व पोपट घोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी रानभाज्या महोत्सवाचा उद्देश विषद केला. या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन बाळनाथ सोनवणे यांनी केले. आभार बाळासाहेब बांबळे यांनी मानले.

कृषी विभागाच्या आवाहनास दाद देऊन परिसरातील नागरिकांनी कोळू, बडदा, आंबट वेल, बांबू कोहिली, भोकर, तांदूळजा विविध प्रकारचे माठ, सराटा, रानरिंगणी, कडू शेवगा, अगस्ता, कस्तुर भेंडी, मायाळू, मोह, कुरडू, कुसर, करटुले, डुक्करकंद, फांजभाजी, समुद्र वेल, चाई, तोंडली, कॅना, रानमठ, रानकेळी, अंबाडी, उंबर चित्रक, आबई, भारंगी, करंदे, बरकी, बाफळी, आघाडा, मेक, शिरपुंज, भुईआवळा, चिचुरड अशा नाना प्रकारच्या रानभाज्या संकलित करून मांडल्या होत्या.

या महोत्सवात उपस्थितांंनी नाचनीची भाकरी आणि तांदळाची भाकरी, आळूची वडी, भोकराची, भारंबिची, कोरडूची सुकी भाजी व रेतडाची पातळ रस्सा व काळभाताचा भात अशा भोजनाचा आस्वाद घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com