कळसूबाईच्या पायथ्याशी अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप मुक्तता करणारे खरे हिरो

कळसूबाईच्या पायथ्याशी अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप मुक्तता करणारे खरे हिरो

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नदी-नाले यांना पूर आलेला आहे. नदी नाल्यांचा अंदाज न आलेले पर्यटक अडकले. या अडकलेल्या पर्यटकांची जहागिरदार वाडीच्या तरुणांनी मोठ्या धाडसाने सुखरुप मुक्तता केली आहे. जहागिरदारवाडीचे हे तरुण खर्‍या अर्थाने हिरो ठरले आहेत.

तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर होय. कळसूबाईचे हेच शिखर सर्वच पर्यटकांना आकर्षित करत असते. गेली दहा-पंधरा दिवस या भागामध्ये अतिवृष्टी होत आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. पावसाचा अंदाज न आल्याने तसेच येथील नदी नाल्यांचा अंदाज नसलेले सुमारे एक हजार पर्यटक कळसूबाईचे दर्शन घेऊन खाली उतरले परंतु त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी मोठे नदी नाले पार करावे लागणार होते. हे नदी नाले ओसंडून वाहत असताना व उग्र रूप धारण केलेले असताना एकाही पर्यटकाला ते पार करून येणे शक्य नव्हते.

पाण्यात उतरल्यास जीव जाण्याचा धोका होता. गावातील धाडसी तरुण व गावचे उपसरपंच असलेले जहागीरदार वाडीचे पंढरी खाडे यांनी आपले मित्र संजय खाडे, हिरामण खाडे, बाळू घोडे, नवनाथ खाडे, शंकर खाडे, अंकुश करटुले, संतोष खाडे, एकनाथ खाडे, भरत घारे, तुकाराम खाडे, जयराम खाडे, केशव खाडे, नामदेव करटुले यांच्यासह गावातील तरुणांना एकत्र करून रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे ठरवले. पंढरी खाडे इंजिनियर असल्याने त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.

गावातील लोकांकडून मोठे दोर एकत्र करून त्यांनी आपल्या मित्रांसह एक एक करून सुमारे 800 ते 1000 पर्यटकांची सुखरूप मुक्तता केली. मुंबई, नाशिक, पुणे या भागातून आलेले हे पर्यटक होते. नदीपार करून आल्यानंतर या पर्यटकांनी या तरुणांना आशीर्वाद देत काही पैसे देऊ केले. परंतु जीव वाचवणे हेच आपले अंतिम ध्येय होते त्यामुळे पैसे नकोत तुम्ही सुखरूप घरी जा असा मायेचा आधार या तरुणांनी ह्या पर्यटकांना दिला.

पंढरीनाथ खाडे आणि गावातील या तरुणांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गावोगावी असे धाडसी तरुण आजही आहेत व गावामध्ये आजही समाजाप्रती आदर आणि निष्ठा आहे हेच या तरुणांनी दाखवून दिले आहे. पंढरी खाडे आणि त्यांच्या सवंगड्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com