कळसुबाईच्या पायथ्याशी भरले पहिले डांगी जनावरांचे प्रदर्शन

कळसुबाईच्या पायथ्याशी भरले पहिले डांगी जनावरांचे प्रदर्शन

अकोले |प्रतिनिधी| Akole

आदिवासी भागाचे आणि सह्याद्रीच्या कातीव कड्यांचे वैभव असलेले डांगी पशुधन म्हणजे या भागाचे वैभव आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदारवाडी या टुमदार व निसर्गसुंदर गावांमध्ये तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामदैवत असलेल्या कळसुबाई यात्रेनिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एएसके फाउंडेशन मुंबई व बायफ संस्था पुरस्कृत समृद्ध किसान प्रकल्प, आमदार डॉ. किरण लहामटे, सदस्य व ग्रामस्थ जहागीरदार वाडी तसेच गोविंदराव खाडे प्रतिष्ठान, कळसुबाई यात्रा उत्सव समिती जहागीरदारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी जनावरांचे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा मुख्य हेतू डांगी जनावरांच्या संगोपना विषयी तंत्रशुद्ध माहिती परिसरातील शेतकर्‍यांना करून देणे. दर्जेदार डांगी पैदास व संवर्धन करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान करणे. डांगी जनावरांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा होता.

अकोले आणि इगतपुरीच्या सीमारेषेवर असलेल्या या गावांना डांगी जनावरांच्या व्यापारासाठी विशेष महत्त्व आहे. प्रदर्शनाचे हे प्रथम वर्ष होते. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, विभागीय अधिकारी जितीन साठे, पं. स. चे माजी उपाध्यक्ष मारुती मेंगाळ, वासाळी गावचे सरपंच काशिनाथ कोरडे व इतर ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रदर्शनासाठी घोटी, इगतपुरी, राजूर, कोतुळ, समशेरपुर, सिन्नर इत्यादी भागातून मोठ्या प्रमाणावर डांगी जनावरे प्रदर्शनात आली होती. शेतकर्‍यांना अन्ना तंगी पशुधन व्यवस्थापन व पैदास याविषयी तांत्रिक माहिती व्हावी तसेच स्थानिक जैवविविधता संवर्धन यांचे महत्त्व समजावे यासाठी बायफ च्या वतीने यात्रेदरम्यान प्रदर्शन भरवण्यात आले होते.

या भागातील आदिवासी बांधव डांगी जनावरांचा वापर डोंगर उतारावरील शेती फुलवण्यासाठी उपयोग करत असतात. या भागातील डोंगर उतारावरील शेती कसण्यासाठी डांगी प्रजातीचे बैल योग्य पर्याय ठरत असल्याने या प्रजातीस मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या बाजारात सर्वात मोठी बोली लागलेली जोडी दोन लाख रुपयांची होती. या प्रदर्शनामध्ये सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. येत्या काळात या प्रदर्शनाला राज्यस्तरीय बनवण्यासाठी ग्रामस्थांचे लक्ष असणार आहे.

या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी बायफ संस्थेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी विशेष योगदान दिले. प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरलेल्या गंभीरेवाडी येथून आलेल्या विठ्ठल सोमा गंभीरे यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य ठरला तो बारी गावातून आणलेला गणेश तातळे या यांचा 70 किलो वजनाचा बोकड अतिशय रुबाबदार आणि देखण्या या बोकडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच चंद्रभान खाडे, पंढरीनाथ खाडे, हिरामण खाडे, रविंद्र खाडे, अंकुश करटुले, बाळू घोडे, यशवंत खाडे, पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, वनविभाग यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.