काजवा महोत्सवाच्या नियोजनाची ऐसी-तैशी

पर्यटकांचा धिंगाणा सुरुच, रात्री दहानंतर अभयारण्यात सर्रास प्रवेश
काजवा महोत्सवाच्या नियोजनाची ऐसी-तैशी

अकोले |प्रतिनिधी| Akole

हरिश्चंद्रगड कळसूबाई अभयारण्य आणि भंडारदरा परिसरात बहुचर्चित काजवा महोत्सवास सुरुवात झाली असली तरी वनविभागाचे ढिसाळ नियोजन, पर्यटकांकडून फक्त आर्थिक वसुली आणि सुरक्षेचा अभाव असे प्रकार आढळून येत आहेत.

अकोले तालुक्यातील काजवा महोत्सवास सुरुवात झाली आहे. मे महिन्याचा शेवट आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या परिसरातील जंगलांमध्ये विविध झाडांवर अक्षरश: करोडो काजव्यांचा लखलखाट सुरू असतो. अगदी दिव्यांची दीपमाळ लावल्याप्रमाणे हे काजवे झाडांवर चमकत असतात. हे पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक याठिकाणी येत असतात.

काजवा महोत्सवामुळे होणारे वाईट परिणाम, पर्यावरणाची हानी आणि काजव्यांच्या जाती नामशेष होण्याची भीती. यामुळे यापूर्वी वनविभाग, ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी यामध्ये बराच काथ्याकुट झालेला आहे. उत्सव घ्यावा की नाही. पाहण्यास परवानगी द्यावी की नाही. यावर बरेच वादविवाद झाले आहेत. यावर्षी वनविभागाने पर्यटकांवर विविध अटी लादून काजवे पाहण्यास परवानगी दिली आहे. वनविभागाने अटी लादण्याचे काम केले असले तरी प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्य आहे. वनविभाग कुठलीही काळजी घेताना दिसत नाही. काजव्यांचे जीवन आणि निसर्ग रामभरोसे आहे.

भंडारदरा धरणाभोवती बॅक वॉटरच्या मार्गावर काजवे पाहण्यास अनेक नागरिक, पर्यटक येत असतात. धरणाच्या सांडव्या जवळील रस्त्यावरून सुरुवात करून पूर्ण धरणाला, धरणाच्या बॅक वॉटरला वळसा घालून रतनवाडी साम्रद मार्गे उडदावणे पांजरे करत पर्यटक भंडारदारा येथे येतात. आणि या मार्गावर काजवे पाहून पुन्हा माघारी जातात.

सांडव्याजवळ वनविभागाचा चेक पोस्ट आहे. काजवे पाहण्यासाठी आलेल्या गाड्या व पर्यटक येथून सोडण्यात येतात. चेक पोस्टवर स्थानिक लोकांचा आणि वनविभागाच्या लोकांचा बंदोबस्त ठेवून सुरक्षित केलेला आहे. चेक पोस्टवरून वाहने सोडण्यात येतात. वाहनाचे शंभर रुपये आणि प्रत्येक व्यक्तीकडून तीस रुपये वसूल केले जातात. त्याशिवाय वाहन सोडले जात नाही. या चेक पोस्टवर फक्त पैसे गोळा करणे एवढा एकच उद्योग वन विभागाकडून सुरू आहे. कुठल्याही प्रकारची वाहनांची तपासणी होत नाही. वाहनात काय आहे हे पाहिले जात नाही. फक्त पैसे घ्यायचे आणि वाहने अभयारण्यात सोडून द्यायची एवढा एकच उद्योग याठिकाणी चालू आहे.

विशेष म्हणजे हा संपूर्ण मार्ग पूर्णपणे उखडलेला, खड्डे पडलेला, अरुंद, रस्त्यावर दगड, डबर, खडी पसरलेला असून रात्रीच्यावेळी प्रवास करण्यात अतिशय घातक आणि अवघड झालेला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी वनविभागाने कुठलीही काळजी घेतलेली नाही. संपूर्ण अभयारण्याच्या या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे सुरक्षारक्षक नाही. कुठेही वाहनांची तपासणी केली जात नाही. पर्यटक काय करतात, हुल्लडबाजी करतात का, कुठे थांबले आहेत हे पाहिले जात नाही. तसेच दिशादर्शक, माहितीदर्शक फलक कुठेही लावलेले नाहीत. दोन दिवसांपासून रतनवाडी मार्गे जाणारा रस्ता बंद होता याठिकाणी रस्त्याचे काम चालू असल्याने साम्रद घाटघरकडे जाणारा रस्ता बंद करून टाकला असल्याने अनेक पर्यटकांना माघारी जावे लागले. रस्ता कामामुळे बंद आहे अशा कुठल्याही सूचना चेकपोस्टवर दिल्या जात नाहीत.

दुसरा चेक पोस्ट घाटघरकडे जाणार्‍या मार्गावर असून याठिकाणी उडदावणे व पांजरे कडे जाणार्‍या गाड्या अडवून तेथेही वसुली केली जाते. सुविधा मात्र कोणत्याही नाहीत. या परिसरात रोजगाराच्या नावाखाली तात्पुरते टेन्ट हाऊस, हॉटेल दुकाने सुरू झाली आहेत. येथेही कुठले नियम पाळले जात नाहीत. तंबूमध्ये राहणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षा काय यावर कोणीही बोलत नाही. सर्रासपणे दारू उपलब्ध होते. सोप्या पद्धतीने दारू विकली जाते. या सर्व बाबींकडे वनविभागाचे दुर्लक्ष दिसते.

विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत या मार्गावर आणि काजव्यांच्या परिसरात पर्यटकांना कुठेही पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. पोलिसांकडून देखील कोणत्याही वाहनाची तपासणी होत नाही. पोलीस किंवा वन विभागाचे गस्त पथकही आढळून आले नाही. गाड्यांचे कर्कश हॉर्न आणि गाड्यातील डिजेंचा धिंगाणा मात्र चालूच आहे. पोलिसांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती.

एकंदरित पाहता पोलीस आणि वन विभाग यांनी काजवा महोत्सव वार्‍यावर सोडून दिला आहे असेच चित्र दिसून येत आहे.

रात्री दहानंतर अभयारण्यात सर्रास प्रवेश

अभयारण्यात आणि भंडारदरा परिसरात काजवा महोत्सव पाहण्यासाठी रात्री दहाच्या आत येणार्‍या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल त्यानंतर आलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. असा कडक नियम वनविभागाने केला असला तरी त्या नियमाचे पालन वनविभागाकडूनच केले जात नाही. रतनवाडीच्या मार्गावर जाणार्‍या अनेक वाहनांना रात्री दहानंतर प्रवेश दिला जातो. त्यासाठी रात्रीच्या अंधारात काय केले जाते हे वनविभागाला आणि पोलिसांनाच माहीत असावे. मात्र ठरलेल्या नियमाप्रमाणे कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. काजवा महोत्सवासाठी जाहीर केलेल्या ठराविक ठिकाणा व्यतिरिक्त या संपूर्ण अभयारण्यात कुठेही या आणि कुठेही जा, आवो जावो घर तुम्हारा, अशी परिस्थिती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com