पूर्वीच्या ठिकाणी भाजी मार्केट सुरू करा - सदाफळ

पूर्वीच्या ठिकाणी भाजी मार्केट सुरू करा - सदाफळ

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील चितळी रोड लगत सुरू असलेला भाजीपाला बाजार पूर्वीच्या ठिकाणी वीरभद्र मंदिराच्या पाठीमागे तात्काळ सुरू करून भाजी विक्रेते व ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्याअधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे. कैलास सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की राहाता चितळी रोड लगत सुरू असलेला भाजीपाला बाजारामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

रोडलगत भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पर्यायाने त्यांना रोडवर भाजी विक्रीसाठी बसावे लागते परिणामी या रोडवरून जाणार्‍या येणार्‍या वाहनांची वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. भाजीपाला खरेदी साठी येणार्‍या ग्राहकांना वाहन रस्त्याच्या कडेला उभे करावे लागते त्यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमी याठिकाणी घडतात. नागरिकांना भाजी खरेदी साठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होते. चितळी रोड लगत असलेल्या नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलास समोर भाजी विक्रेते व्यवसाय करण्यासाठी बसत असल्याने व्यापारी संकुलामध्ये येणार्‍या ग्राहकांना जागा नसल्या कारणाने व्यापारी संकुल मध्ये अनेक व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

अनेकदा व्यापारी संकुलातील व्यवसाय व भाजी विक्रेते यांच्यात जागेच्या कारणावरून शाब्दिक चकमक होते. सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांची टायरची माती मिश्रित पाणी भाजी विक्रेत्यांच्या शेतीमालावर पडून मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातल्याने हातावर पोट असणार्‍या नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. राहाता नगरपरिषदेने हातावर पोट असणार्‍या अनेक व्यावसायिकांना अतिक्रमणाचे कारण देऊन त्यांना जागा न दिल्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.

नगरपालिका प्रशासन ओळखीच्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा देते परंतु गरजू व्यावसायिकांना जागा उपलब्ध नाही असे सांगितले जाते प्रशासन कोविड कारण सांगून भाजी विक्रेत्यांना पुर्वीच्या ठिकाणी जागा देत नाही. परंतु सध्या ज्या ठिकाणी भाजीविक्रेते बसत त्या ठिकाणी कोविड संसर्ग वाढत नाही का असा सवाल नागरिक करीत आहे .नगरपंचायत इमारतीसमोर भाजी विक्रेत्यांना नियमाचे पालन करून जागा उपलब्ध करून दिली तर मोठ्या जागेत नियमाचे पालन करून नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी येणे सोपे होईल.

व नगरपरिषद समोर भाजी विक्रेते जागा दिल्याने त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहणे सोपे होईल. मुख्याधिकारी यांनी राहातेकरांच्या भावना लक्षात घेऊन छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून कोरोना काळात संकटात सापडलेल्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कैलास सदाफळ यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.