आ. काळेंनी शिवसैनिकांचा अभिमान असल्याचा खोटा पुळका दाखवू नये - कैलास जाधव

आ. काळेंनी शिवसैनिकांचा अभिमान असल्याचा खोटा पुळका दाखवू नये - कैलास जाधव

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी शिवसैनिकांचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यावर शिवसेनेत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून ज्यांनी स्वतः शिवसेना संपवण्याचा प्रयत्न कोपरगावमध्ये केला त्या आमदार आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या आडून मतांचे राजकारण साधू नये, अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी केली आहे.

अडीच वर्षे शिवसेना सोबत सत्तेत असताना राष्ट्रवादीचे आमदार काळे यांनी एकदाही शिवसैनिकांना कधी बैठकींना बोलावले नाही किंवा कधी विश्वासात घेऊन काही समन्वय ठेवला नाही. काळे यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला काही कार्यक्रम घेतला नाही. शिवसैनिक आपसात कसे झुंजत राहतील यावर लक्ष ठेवून होते. एकीकडे शिवसैनिक नगरसेवक अपात्र होण्यासाठी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणला व त्या नगरसेवकांना जास्त त्रास कसा होईल यासाठी आपली शक्ती आमदार काळे खर्च करताना दिसले.

प्रशासनात वर पासून खालपर्यंत आमदार काळे यांनी फोन करून कोपरगावच्या शिवसैनिकांना त्रास दिला ही जखम ताजी असताना काळेंनी शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे दुटप्पी वक्तव्य करणे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली स्वर्ग को’ अशी गत आहे. शिवसेनेने दोन वेळा काळे कुटुंबाला आमदारकी मिळवून दिली पण स्वार्थासाठी काळेंनी त्यावेळी शिवसैनिकांचा विश्वासघात करून पक्ष सोडला.एवढे वर्ष पक्ष सोडल्यानंतर यांना कधीही शिवसैनिक आठवला नाही मात्र आता भविष्यात येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मतांची गोळाबेरीज हिशोबात घेऊन आमदार काळेंनी केलेले वक्तव्य म्हणजे ‘राजकारणासाठी काही पण’ अशी अवस्था असल्याचे कैलास जाधव यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com