10 हजारात कडबाकुट्टी देण्याचे आमिष; शेतकर्‍याची फसवणूक

जिल्हा परिषदेत घेतले पैसे || तोतयाची बनवेगिरी
10 हजारात कडबाकुट्टी देण्याचे आमिष; शेतकर्‍याची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत यापूर्वी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देतो म्हणून काही तोतया एजंट लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचे प्रकार झालेले आहेत. असाच एक प्रकार पुन्हा जिल्हा परिषदेत घडला. जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे, कडबाकुट्टी यंत्र मिळवून देतो, असे सांगून एका तोतया इसमाने पारनेर तालुक्यातील शेतकर्‍याकडून 10 हजार रूपये घेऊन पोबारा केला.

काही वेळाने संबंधित शेतकर्‍याने कृषी विभागात विचारणा केली. मात्र अशा नावाचा कोणी कर्मचारी आपल्याकडे नाही. शिवाय कोणत्याही योजनेसाठी असे पैसे लागत नाहीत, असे कृषी विभागाने स्पष्ट करताच आपण फसवलो गेल्याचे शेतकर्‍याच्या लक्षात आले. दरम्यान यासंदर्भात पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

बुधवारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतकर्‍यासह दोघेजण कृषी विभागात विचारपूस करत आले. जिल्हा परिषदेचा कर्मचारी असल्याचे सांगून एका इसमाने आमच्याकडून काही वेळापूर्वी याच इमारतीत 10 हजार रूपये घेतले. पॅसेजमध्ये सीसीटीव्ही आहेत म्हणून त्याने स्वच्छतागृहात बोलावून पैसे घेतले. तुम्ही येथेच थांबा काही वेळात फाईल घेऊन येतो म्हणून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहिली, परंतु तो आला नाही. कृषी विभागातून कडबाकुट्टी योजना चालते, म्हणून तुमच्याकडे आलो, असे तो शेतकरी कर्मचार्‍यांना सांगत होता.

येथील कोणत्याही योजनेसाठी पैसे लागत नाही, असे कृषीतील कर्मचार्‍यांनी त्याला सांगितले. त्यानंतर आपण फसवलो गेल्याचे त्या शेतकर्‍याच्या लक्षात आले. हा शेतकरी पारनेर तालुक्यातील जामगाव येथील आहे. संबंधित तोतया इसमाची व या शेतकर्‍याची फोनवरून ओळख झाली. कडबाकुट्टीसाठी 25 ते 40 हजार रूपये लागतात. परंतु 10 हजार रूपयांत कडबाकुट्टी मिळतेय.

शिवाय जिल्हा परिषदेचा कर्मचारी असल्याचे सांगतोय म्हटल्यावर खात्रीने योजनेचा लाभ होईल, असे समजून या शेतकर्‍याने तोतयाला 10 हजार रूपये दिले. जिल्हा परिषदेत यापूर्वीही कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देतो म्हणून काही तोतया एजंट लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचे प्रकार झालेले आहेत. त्यानंतर कृषी विभागाने पोलीस ठाण्यात तसा तक्रार अर्ज करून शेतकर्‍यांनी अशा फसवेगिरी करणारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com