वरिष्ठ गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला नगरमध्ये सुरूवात

पुणे, कोल्हापूर यांची महिलांत, तर नगर, मुंबई शहर, नंदुरबार, उस्मानाबाद यांची पुरुषांत विजयी सलामी
वरिष्ठ गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला नगरमध्ये सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुणे, कोल्हापूर यांनी महिलांत, तर अहमदनगर, मुंबई शहर, नंदुरबार, उस्मानाबाद यांनी पुरुषांत विजयी सलामी दिली. अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या विद्यमाने वाडिया पार्कच्या मैदानावरील मॅटच्या क्रीडांगणावर मंगळवारपासून 70 व्या वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली.

दरम्यान, काल सायंकाळी नगर दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील, पद्मश्री पोपटराव पवार, कबड्डी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, माजी आ. दादा कळकर, बाळासाहेब हराळ यांच्यासह राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हवेत फुगू सोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यानंतर सुरू झालेल्या सामन्यांत यजमान नगर जिल्ह्यातील खेळांडूना संमिश्र यशाला सामोरी जावे लागले. पुरुषांच्या अ गटात नगरच्या पुरुष संघाने हिंगोलीला 67-20 असे पराभूत करीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. मध्यांतराला 34-12 अशी आघाडी घेणार्‍या गतविजेत्या नगरने उत्तरार्धात अधिक जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. आदित्य शिंदे, सौरभ राऊत यांच्या धारदार चढाया त्याला शंकर गदई, संभाजी वाबळे यांची मिळलेली पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. हिंगोलीचा आफताब शेख चमकला.

नगरच्या महिलांना मात्र इ गटात कोल्हापूरकडून 47-20 असा पराभव पत्करावा लागला. स्नेहल शिंदे, प्रीती करवा यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाने कोल्हापुरने ही किमया साधली. नगरची ऋतुजा टिक्कल बरी खेळली. अ गटात पुण्याच्या महिलांनी परभणीला 55-15 असे नमवित आपली विजयी सुरुवात केली. आम्रपाली गलांडे, अंकिता जगताप यांच्या धडाकेबाज खेळाने पुण्याने गुणांचे अर्धशतक पार केले. परभणीची निकिता लंगोट एकाकी लढली. पुरुषांच्या ब गटात गतउपविजेत्या मुंबई शहरने अत्यंत चुरशीच्या लढतीत रायगडला 39-28 असे नमवित विजयी सलामी दिली.

विश्रांतीला 14-15 अशा पिछाडीवर पडलेल्या मुंबईने उत्तरार्धात टॉप गिअर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला. प्रणय राणे, सुशांत साईल यांच्या झंजावाती चढाया, त्याला संकेत सावंतची मिळालेली पकडीची साथ यामुळे मुंबईने बाजी पलटविली. रायगडच्या प्रशांत जाधव, चेतन पाटील, मयुर कदम यांचा जोश उत्तरार्धात कमी पडला. नंदूरबारने फ गटात लातूरला 45-19 असे नमविले. ऋषिकेश बनकर, राहुल ढोबळे यांच्या चतुरस्त्र खेळाने ही किमया साधली. लातूरचा ज्ञानोबा येवले चमकला. उस्मानाबादने फ गटात सिंधुदुर्गला 40-25 असे पराभूत केले. प्रथमेश बोदर, सुग्रीव पुरी, सूरज शिंदे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उस्मानाबादने हा विजय साकारला. सिंधुदुर्ग कडून वेदांत हरमळकर, शुभम धुरी उत्तम खेळले.

स्पर्धेच्या उद्घाटनानंतर बोलतांना खा. डॉ. सुजय विखे म्हणाले की, 70 व्या वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा मान नगर मिळाला हे चांगलेच आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचे सोने करावे. या स्पर्धेसाठी अनेक आमदार यांनी निधी दिला. पक्षीय जोडे बाजूला ठेवून ग्रामीण भागातील खेळांडूसाठी स्पर्धा व्हावीत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मॅटसाठी मागणी करताच त्यांनी 52 लाख रुपये उपलब्ध करून दिले. यापुढे प्रत्येक मंत्री, पालकमंत्री यांनी ग्रामीण भागातील खेळांडू यांना सुविध उपलब्ध करून द्याव्यात, याची सुरूवात नगरपासून झाल्याचा अभिमान असल्याचे खा. विखे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com