शिर्डी (प्रतिनिधी) -

नविन वर्ष सुख आणि समृद्धीचं जावे म्हणून थर्टी फस्टच्या मध्यरात्री अनेक शिर्डीकर साईबाबांच्या मंदिरात जावून

बाबांचे आशीर्वाद घेतात. याहीवर्षी नगराध्यक्षांसह काही पदाधिकारी मंदिरात साईंच्या दर्शनासाठी जात असताना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्यांना अडवून दर्शनापासून रोखले. त्यामुळे पदाधिकारी ग्रामस्थ व कार्यकारी मुख्याधिकारी यांच्यात वाद झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आडमुठे धोरणाचा शिर्डीत निषेध करण्यात आला.

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त तथा नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजीत गोंदकर यांच्यासह अनेक शिर्डीकरांना मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी साई मंदिरात जाताना रोखले. तुम्हाला सर्वात प्रथम सोडतो अस म्हणत हुल देऊन कार्यकारी अधिकार्यांनी नगराध्यक्षांना शनिगेट जवळून बाहेर काढले.

31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजे साधारण साडे अकरा वाजता काही ग्रामस्थ, मानकरी आणि पदाधिकारी शनिगेट जवळील प्रशासकीय व्दारा जवळ जाऊन थांबले होते. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी बागटे यांनी धावत येत तुम्ही येथे कसे आलात. चला मागे चला अस म्हणत काही पदाधिकार्यांना खेचण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर कॅमेरा चित्रीकरण सुरु ठेवले. यावेळी नगरसेवक सुजीत गोंदकर यांनी आपण आधी कॅमेरे बंद करा, नंतर आपण जिथे म्हणाल तिथं येऊ अशी भुमिका घेतली. मात्र तरीही संस्थानचे चित्रीकरण सुरुच राहिल्याने अखेर ग्रामस्थ आणि बगाटे यांच्या नववर्षाच्या प्रारंभेलाच तू-तू मै-मै झाली.

सर्व ग्रामस्थांना प्रशासकीय इमारती जवळील प्रवेशव्दाराजवळून बगाटे यांनी बाहेर काढले. तुम्हाला दुसर्या गेटने सोडतो, असे म्हणत प्रवेशव्दार क्रमांक दोन जवळ नेले. यावेळी पुन्हा ग्रामस्थ आणि त्यांचा वाद सुरु होण्यास सुरुवात झाली. यावेळी तर बगाटे यांनी चक्क लोटांगण देखील घेतले. यामुळे ग्रामस्थ आणि पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी मागे फिरणे पसंत केले.

नगराध्यक्ष आणि काही ग्रामस्थ गेल्याचं दिसताच बगाटे मोठा लवाजमा घेवून पुन्हा शनिगेटकडे गेल्याने नगराध्यक्षांनी त्यांचा निषेध केला. नविन वर्षाच्या प्रारंभाला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांना मिळालेली वागणूक नक्कीच निंदणीय असून शहराच्या नगराध्यांना आणि पदाधिकार्यांना अशा प्रकारे रोखणे, तसेच आपल्या मर्जीतील व्हीआयपींना सोडणे हे चुकीचे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आपण नववर्षा निमित्तानं साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतो. एकचं भावना असते बाबांचे दर्शन व्हावं मात्र आज पहिल्यांदाच नविन वर्षाला मंदिरात जात आलं नाही. अधिकर्यांनी अशा पद्धतीनं कुणालाच वागणूक देऊ नये.

- अनिता जगताप, नगरसेवक

नवीन वर्षानिमित्ताने आपण साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. फक्त दर्शन घेवूद्या एवढीच प्रांजळ मागणी आम्ही करत होतो. मात्र तरीही शिर्डीकरांना आत सोडले नाही मात्र त्यांच्या सोबतच्या व्हीआयपींना त्यांनी सोडले

- शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष