
उंबरे |वार्ताहर| Umbare
बारा दिवसांपूर्वी वांबोरी परिसरातील ज्या विहिरीमध्ये पत्नीचा मृतदेह तरंगताना मिळून आला होता. त्याच विहिरीमध्ये शुक्रवारी दुपारी पती संतोष बाळासाहेब गोपाळे (वय 39) रा. वांबोरी याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच विहिरीत पतीचा मृतदेह आढळून आल्याने या तरुण दांपत्याच्या मृत्यूचे गुढ उकलण्याचे मोठे कसब पोलीस प्रशासनावर आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, 30 जानेवारी रोजी वैशाली बाळासाहेब गोपाळे ही आपल्या राहत्या घरातून मामाकडे जाते, असे सांगून निघून गेली. दोन दिवस शोध घेऊनही ती सापडली नाही. शेवटी 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वांबोरी येथील एका मंदिराशेजारील विहिरीत वैशालीचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान दोन दिवसापूर्वीच पती संतोष हा वैशालीचा दशक्रियाविधी उरकून मुळगाव गोमळवाडी तालुका नेवासा येथून वांबोरी सुभाषनगर येथील आपल्या राहत्या घरी आला होता. परंतु, मानसिक विवंचनेने ग्रासलेल्या संतोषने आपले अर्धांगिणी अचानक आपल्याला सोडून गेल्यामुळे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ज्या विहिरीत पत्नी वैशालीचा मृतदेह आढळून आला, त्याच विहिरीत पतीनेही आपली जीवनयात्रा संपल्याचे प्रथमदर्शनी पोलीस सूत्रांकडून समजते आहे.
मागील सात आठ वर्षापासून वांबोरी परिसरामध्ये रोजगाराच्या शोधात आलेले गोपाळे कुटुंबातील संतोष ड्रायव्हर म्हणून तर पत्नी वैशाली शेतीवर रोजंदारीवर जे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते व दोन मुलांसह कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढत होते. याच दरम्यान संतोष गोपाळे यांनी फायनान्सचे कर्ज घेऊन मालवाहतूक टेम्पो घेतला. टेम्पोच्या व्यवसायातून कर्जाचे हप्तेही फिटत नव्हते.
उलट आणखी कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. त्यामुळे पुन्हा फायनान्स गटाकडून कर्ज उचलून टेम्पोचे कर्ज भरण्याचा प्रयत्न या दांपत्याने केला. परंतु, कर्ज अधिकच वाढत चालले होते. याच कारणाने पत्नीने बारा दिवसांपूर्वी व नंतर शुक्रवारी पतीने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याचे चर्चा परिसरात दबक्या आवाजात होत आहे.
फायनान्सच्या कर्जासह इतर कर्जामुळेच दोन मुलांचे डोक्यावरील छत्र तर वृद्ध आई-वडिलांचे म्हातारपणाचा आधार गेल्यामुळे वांबोरी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या दांपत्याचा मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
खाजगी सावकाराने आपल्या कर्जाच्या बदल्यात मालवाहतूक टेम्पो ओढून नेल्याचे परिसरात बोलले जात आहे. तसेच परीसरातील आणखी काही बड्या खाजगी सावकारांना संतोषच्या आत्महत्येची बातमी कळताच ते नॉटररिचेबल झाले असल्याने अशा सावकारांमुळेच गोपाळे दांपत्याने आपले जीवन संपवले की काय? याबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त होत आहे
या घटनेविषयी पोलिसात सावकाराचे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अजून कोणीही पुढे न आल्यामुळे सध्या तरी याविषयी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जर या घटनेबाबत कोणी पुढे येऊन फिर्याद दिली तर निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.