जोगेश्वरी सोसायटी निवडणुकीत 13 जागेसाठी 65 अर्ज

निवडणूक गाजणार; तिरंगीची शक्यता
जोगेश्वरी सोसायटी निवडणुकीत 13 जागेसाठी 65 अर्ज

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीच्या राजकारणातील व येणार्‍या नगरपालिकेची दोन ते तीन प्रभागातील सेमीफायनल ठरणार्‍या जोगेश्वरी आखाडा विकास सेवा सोसायटी निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. सोसायटीच्या एकूण 13 जागांसाठी छाननीनंतर एकंदर 65 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

सोसायटीमध्ये बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व ना. प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाची धुरा कारखान्याचे विद्यमान संचालक विजय डौले व नगरसेवक प्रकाश भुजाडी यांच्या खांद्यावर प्रामुख्याने असून विखे-कर्डिले गटाच्या वतीने राजेंद्र काळे व सुरेश भुजाडी नेतृत्व करीत आहेत. सोसायटीचे गेली सहा वर्ष अध्यक्षपद भूषविलेले शिवाजीराव डौले यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता पत्नी सौ. रंजना डौले व भगिनी सुनिता भुजाडी यांचे अर्ज दाखल करून घेतले आहेत. याचबरोबर पुतणे राहुल डौले यांचाही अर्ज त्यांनी दाखल केला आहे.

मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हरकती-प्रति हरकतीचा वाद थेट औरंगाबाद खंडपीठाच्या उच्चन्यायालयापर्यंत गेल्याने ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तिसरा गट उतरण्याची शक्यता दिसत असली तरी त्यांना उमेदवार व मतदारांचा किती प्रतिसाद मिळतो? याची वाट पहावी लागेल. दि.15 मे रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. एकंदरीतच येणार्‍या नगरपालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम होणार असल्याने सर्वांनीच निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

Related Stories

No stories found.