खाजगी हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांची आर्थिक लुट- प्रा. कवाडे
सार्वमत

खाजगी हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांची आर्थिक लुट- प्रा. कवाडे

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

करोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक पिळवणूक केली जाते. तेथे घोटाळे व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करताना या खाजगी रूग्णालयाला फी ठरवून द्यावी. या आजारातून मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या अवयवाची तस्करी होत असल्याचे गंभीर प्रकार कानी पडत असल्याने कोव्हिड सेंटरमध्ये चाललेल्या कारभारावर सरकार व आरोग्य खात्याने कटाक्षाने नजर ठेवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.

करोना महामारी ही गरिबांना उध्वस्त करणारी असून त्यामुळे राज्य देश व जगावर आर्थिक अरिष्ट कोसळले असल्याचा दावाही कवाडे यांनी केला. अकोले येथे एका खासगी विवाहासाठी आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. पक्षाचे जयदीप कवाडे, गणेश सोनवणे, शशिकांत सोनवणे, प्रा. जयंत गायकवाड, सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिक मिडीयाने करोनाच्या बातम्यांचा भडिमार सुरू करून जनतेमध्ये भीती पसरवण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्याच्या धास्तीने भीतीचे तर वातावरण आहेच. पण त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी या वेळेस बोलताना केला.सरकारने याबाबत स्वतंत्र बुलेटिन काढून करोनाची सद्यस्थिती जनतेला दिली पाहिजे.

राज्य सरकार रुग्णांमागे दीड लाख रुपये मदत देते. पण दवाखाने हव्यासापोटी पॉझिटिव्ह नसलेल्या रुग्णांना पॉझिटिव्ह दाखवून लाखांची बिले काढून रुग्णांना अधिक आर्थिक दृष्ट्या पिळवणूक करीत आहे असे स्पष्ट करून लॉकडाउनच्या अंधार यात्रेत जनतेला ढकलण्याऐवजी त्यांना हॉस्पिटल बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी करोना साथ फैलाव होण्यापूर्वीच्या वातावरणाचा व नंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रा. कवाडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याऐवजी या साथीसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक अनुदान प्राप्त करून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com