41 तोळे दागिने चोरणारा सराईत गजाआड

एलसीबीची कामगिरी || तिघे पसार, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
41 तोळे दागिने चोरणारा सराईत गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक येथील घर फोडून 13 लाख 42 हजार रूपये किंमतीचे 41 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेणार्‍या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याचे तीन साथीदार मात्र पोलिसांना सापडले नाही. लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण (वय 33, रा. टेकडी तांडा, वाघळुज, पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

त्याच्याकडून दोन लाख 60 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र, नेकलेस, अंगठी व 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी असा तीन लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. अभिजीत अरविंद गर्गे (वय 55 रा. सुदर्शन रो-हौसिंग, साईरामनगर, भिस्तबाग चौक) यांचे घरी 11 जून, 2022 रोजी नातीचा नामकरण सोहळा असल्याने त्यांचे नातेवाई मुक्कामी आले होते.

त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक यांनी एकत्रित जेवण केल्यानंतर घराची दार-खिडक्या बंद करून झोपी गेले. त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमांनी गर्गे यांच्या घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करून, घरातील बॅगेमध्ये ठेवलेले 13 लाख 42 हजार रूपये किंमतीचे 41 तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, अंमलदार सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, विनोद मासाळकर, आकाश काळे, बबन बेरड व अर्जुन बडे यांचे पथक काम करत होते. लिमनेश चव्हाण हा एका दुचाकीवर चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी जामखेड- नगर रोडने नगरकडे येत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी सदर माहिती पथकास कळवून खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगर-जामखेड रोडने टाकळीकाझी येथील बंद असलेल्या टोलनाक्या जवळ जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम दुचाकीवर जामखेडकडुन नगरकडे जारात दुचाकीवर येताना दिसला. पोलीस पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण असे सांगितले. त्याची झडती घेतली असता सोन्याचे दागिने मिळुन आले. त्याने भिस्तबाग महाल परिसरात नाल्या जवळील एका घरातुन सोन्याचे दागिने चोरी केले अशी कबुली दिली. त्याचे इतर तीन साथीदारांची नावे त्याने पोलिसांना सांगितले. परंतू ते मिळून आले नाही.

चव्हाणविरोधात तीन गुन्हे

ताब्यात घेतलेल्या लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण याने दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने तोफखाना पोलीस ठाण्यात अभिलेख पडताळणी केली असता तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 457, 380 प्रमाणे रात्रीची घरफोडीचा गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने लिमनेश चव्हाण यास मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहे. दरम्यान लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द नगर व बीड जिल्ह्यात एकुण तीन गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com