भांडे, सोने-चांदीचे दागिने उजळून देतो म्हणत दागिने केले लंपास

File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील भेर्डापूर येथे पितांबरी पावडर विकण्यासाठी येऊन आम्ही दागिने देखील उजळून चमकावून देतो असे म्हणून घरकाम करणार्‍या महिलेचा विश्वास संपादन करत महिलेचे 54 हजार रुपयांचे दागिने दोघा चोरट्यांनी लंपास केले.

दि. 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भेर्डापूर येथील जाधव वस्ती येथे मिना ज्ञानेश्वर जाधव या घराबाहेर काम करीत असताना दोन अनोळखी 30 ते 35 वर्षांचे इसम घरासमोर पितांबरी पावडर विकण्यासाठी आले. आम्ही देवांचे भांडे, चांदी, सोने उजळून चमकावून देतो, असे म्हणाल्याने मिना जाधव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चांदीची अंगठी आणि जोडवे उजळण्यासाठी दिले. त्यांनी ते घासून उजळून परत दिले. त्यानंतर त्या दोघा भामट्यांनी अजून काही दागिने आहेत का? असे विचारले जाधव यांचा विश्वास संपादन झाल्याने त्यांनी देवाची भांडी गळ्यातील सोन्याचे दागिने, सोन्याचे मणी असलेले पॅडेल आणि त्यांच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र असे उजळवण्यासाठी त्यांना घराबाहेर आणून दिले.

तेव्हा दोघा भामट्यांनी त्या दागिन्यांना पावडर लावली आणि मिना जाधव यांना घरातून झाकणाचा छोटा स्टिलचा डबा आणायला सांगितले. त्यांनी डबा आणला तेव्हा दोघा भामट्यांनी दागिने डब्यात टाकल्याचे दाखवत जाधव यांना सांगितले की 15 मिनिटांनंतर हा डबा गॅसवर ठेवून नंतर दागिने काढून घ्या, असे म्हणून दोघे भामटे मोटारसायकलवर निघून गेले. त्यानंतर जाधव यांनी 15 मिनिटांनंतर डबा उघडून पाहिला असता दोघा भामट्यांकडे दिलेले 54 हजार रुपये किंमतीचे दागिने डब्यामध्ये नव्हते. त्यानंतर त्यांनी मुलाला घेऊन घराच्या आजूबाजूला, गावात दोघा भामट्यांचा शोध घेतला परंतु, ते दिसून आले नाही. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मिना जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दोघा भामट्यांविरूद्ध भादंवि कलम 34, 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com