
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जुनी वसंत टेकडी रोडवरील चंदूकाका ज्वेलर्समधून दोन महिलांनी हातचलाखीने दोन तोळ्याची सोन्याची बांगडी चोरली. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली असून ज्वेलर्समधील सेल्समन हेमंत वसंतलाल पाठक (रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन) यांनी 28 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
25 डिसेंबर रोजी सायंकाळी बुरखा घातलेल्या दोन महिला चंदूकाका ज्वेलर्समध्ये आल्या. फिर्यादी काम करत असलेल्या बांगड्याच्या काऊंटवर त्या गेल्या. त्यांनी फिर्यादीकडे बांगड्यांची मागणी केली. फिर्यादीने त्यांना बांगड्या दाखविल्या. त्या महिलांनी बांगड्या पाहिल्या परंतु घेतल्या नाही. नंतर त्या मंगळसूत्र असलेल्या काउंटरकडे गेल्या आणि दुकानाच्या बाहेर निघून गेल्या.
दरम्यान दुकानातील सोन्याच्या स्टॉकची तपासणी केली असता त्यात एक बांगडी कमी भरली. फिर्यादीने सीसीटीव्ही तपासणी केली असता बुरखा घालून आलेल्या एका महिलेने हातचलाखी वापरून एक सोन्याची बांगडी तिच्या बॅगमध्ये घातलेली दिसली. त्या दुकानाच्या बाहेर आल्यानंतर रिक्षातून निघून गेल्याचेही सीसीटिव्हीत दिसून येत आहे. महिला पोलीस नाईक कविता गडाख अधिक तपास करीत आहेत.