जेऊर परिसरात पावसाचे तांडव; सीना नदीला महापूर

लाखो रुपयांचे नुकसान, बाजारपेठ घुसले पाणी
जेऊर परिसरात पावसाचे तांडव; सीना नदीला महापूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-औरंगाबाद महामार्गावर असणार्‍या जेऊर परिसरात सोमवार (दि.30) रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः हाहाकार घातला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जेऊर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने सीना व खारोळी नदीला महापूर आला. सीना नदीचे पाणी जेऊर बाजारपेठेत तसेच गावामध्ये घुसले. गावची मुख्य बाजारपेठ पाण्यामध्ये होती. अनेक दुकानदारांचे साहित्य तर काही दुकानेच वाहून गेली आहेत.

सोमवारच्या पावसाने सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. संतुकनाथ विद्यालयाचा पूल देखील वाहून गेला असून नगर-औरंगाबाद महामार्गावर सीना नदीचे पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चार तास महामार्ग बंद होता. सीना नदीच्या पुलावरुन पाणी गेल्याने महामार्ग बंद राहण्याची पहिलीच वेळ असल्याने पुराच्या पाण्याचा अंदाज येतो. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर व जेऊर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून अंतर्गत रस्ते वाहून गेले आहेत.

पुरामुळे ससेवाडी, तोडमलवाडी, चापेवाडी, शेटेवस्ती येथील नागरिकांचा संपर्क तुटला होता. जेऊर बाजारपेठेत झालेल्या नुकसानीचे खुपच विदारक चित्र पाहावयास मिळत होते. पिंपळगाव तलावात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून तलाव 95 टक्के भरला आहे. जेऊर येथील मुख्य बाजारपेठेत सीना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रशासन सतर्क झाले असुन ग्रामपंचायत, महसुल व कृषी विभागामार्फत पंचनामे व पाहणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, मंडलाधिकारी वृषाली करोसिया, यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, सरपंच सौ. राजश्री मगर व सर्व सदस्यांनी तसेच अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे, माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात

जेऊर गावची मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात वसलेली आहे. अतिक्रमण हटविण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतीला दिलेले आहेत. परंतु अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई झालेली नाही. भविष्यात येथे मोठी दुर्घटना होऊन जिवीतहानी होऊ शकते. तरी प्रशासनाने जेऊर गावातील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

तलाव फुटण्याची अफवा

ससेवाडी व बहिरवाडी येथील वाकीतलाव तसेच बंधारे तुडूंब भरले असून फुटण्याची अफवा जेऊर गावामध्ये पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सर्व तलाव सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com