
जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी गावात अज्ञात दोन मुलांकडून मोहळ काढण्याच्या प्रयत्नाने एक एकर ऊस जळून खाक झाला. त्यात शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सावित्रीबाई शिवाजी वक्ते यांनी सर्वे नंबर 92़/2 या क्षेत्रामध्ये एक एकर ऊस 265 जातीच्या उसाची लागवड केली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला उसाची नोंद करण्यात आली होती. काही ऊस मजुरांनी तोडून नेला होता. दोन-तीन दिवसांत ऊस तोडणीसाठी मजूर येणार होते. मात्र त्यापूर्वीच दोन अज्ञात मुलांनी मोहोळ काढण्याच्या अतिउत्साहामुळे उसाला आग लागली. आगीचा लोळ मोठ्या प्रमाणात असल्याने काही समजण्याच्या आतच उसाने पेट घेतला. निलेश शिवाजी वक्ते हे दुसर्या शेतात काम करीत असताना त्यांना ऊस पेटलेला दिसला.
त्यांनी तात्काळ फोनवरून शिवाजी यादव वक्ते व संजय वक्ते, बाळासाहेब पवार, योगेश वक्ते यांना माहिती दिली. ऊस विझवण्यासाठी संजीवनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये संजय वक्ते, बाळासाहेब पवार, शिवजीराव वक्ते, योगेश वक्ते, निलेश वक्ते, पवन वक्ते, युवराज वक्ते यांनी उसाचे वाढे यांच्या साहाय्याने उसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिक पेट घेतल्यामुळे ऊस जळून खाक झाला.