जेऊर कुंभारी ग्रामपंचायत सदस्य अपात्रता प्रकरण; जिल्हाधिकार्‍यांचे 'हे' आदेश

जेऊर कुंभारी ग्रामपंचायत सदस्य अपात्रता प्रकरण; जिल्हाधिकार्‍यांचे 'हे' आदेश

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील ग्रामपंचायत सदस्य यशवंत विठ्ठल आव्हाड यांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी नुकतीच झाली. यात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना स्थळ निरीक्षण पंचनामा करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल पुढील सुनावणी पूर्वी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. या सुनावणीकडे कोपरगाव तालुक्यातील राजकीय निरीक्षकांच्या लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ज्याप्रमाणे, ग्रामपंचायतीला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थेचा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असेलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून व कायद्याने निर्गमित केलेले पात्रतेचे निकष कायम ठेवून आपले कर्तव्य, जबाबदार्‍या पार पाडावी लागतात. असे कर्तव्य पार पाडत असताना सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी कसूर केल्यास संबंधितास अपात्रतेची तरतूद देखील कायद्यात करून ठेवली गेली आहे.

शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस (ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम अतिक्रमण) (कलम 14 ज) नुसार अपात्र ठरविण्यात येते. जेऊर कुंभारी येथील सदस्य यांच्या कुटुंबाने सरकारी जमिनीत अतिक्रमण केले असल्याने हा तक्रारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा दोषारोप सिद्ध झाल्यास वरीलपैकी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य यांना त्यांच्या अधिकारपदापासून दूर करता येते. याबाबतचे अंतिम निर्णय जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे असतात.

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या जेऊर कुंभारी ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड यांनी सरकारी गट क्रं.134 मधील नऊ एकर क्षेत्रातील जमिनीत अतिक्रमण केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1) (ज-3) व 16 प्रमाणे ग्रामपंचायत सदस्या विरोधात अपात्रतेचा अर्ज काशिनाथ रंगनाथ वक्ते यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेला आहे. त्याची सुनावणी नुकतीच झाली आहे.

त्यावेळी तक्रारदार काशिनाथ वक्ते व विरुद्ध यशवंत विठ्ठल आव्हाड हे दोन्ही पक्षाचे नागरिक उपस्थित होते. आता 10 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यासाठी या प्रकरणात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना स्थळनिरीक्षण पंचनामा करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सुनावणी पूर्वी तहसीलदार सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com