
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील जेऊरकुंभारी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या कारभाराविरोधात थेट गट विकास अधिकार्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
जेऊरकुंभारी ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य असून सरपंचपदी महिला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी अनेक महिन्यांपासून नागरिकांची नाराजी असल्याच्या बातम्या ऐकावयास मिळत होत्या. गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमीचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम, नागरिकांना पिण्यासाठी होणारा पाणीपुरवठा याबाबतीत वेळोवेळी नागरिकांच्या तक्रारी होत्या. परंतु अनिता बाबासाहेब गायकवाड, धनश्री नामदेव वक्ते व किशोर मनोहर वक्ते या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी थेट पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे ग्रामसेवकांच्या कारभाराविरोधात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
या सदस्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे, ग्रामसेवकांकडून कोणत्याही कामाची माहिती मिळत नाही. आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या प्रत्येक मासिक सभेच्या परिपत्रकात संभाव्य खर्च व झालेला खर्च याबाबत ग्रामसेवक माहिती देत नाहीत. दिशाभूल करतात, सभेस उपस्थितांसाठी सह्या करण्यासाठी रजिस्टर ठेवा असे सांगितले तरी ते ठेवले जात नाही. इतिवृत्तावर जबरदस्तीने सह्या घेतल्या जातात. दमबाजी करतात तसेच सदस्यांना विश्वासात न घेता अगोदर निधी खर्च केला जातो व त्याची मंजुरी पुढील मासिक सभेत घेतली जाते.
विचारणा केली तर समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे एकूणच ग्रामसेवकांच्या कारभारामध्ये संशयाला जागा आहे. त्यामुळे त्यांची त्वरित दप्तर तपासणी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रार अर्जात केली असून त्यावर तीन सदस्यांच्या सह्या आहेत. यावर गटविकास अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबत ग्रामसेवकांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्रत्यक्ष ग्रामपंचायतमध्ये भेट दिली असता आठवड्याचा पहिला दिवस असून देखील ग्रामपंचायत कार्यालय बंद होते.