
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जेसीबीचे साहित्य चोरी झालेल्या गुन्ह्याचा छडा कोतवाली पोलिसांनी लावला आहे. या चोरीतील दोन्ही आरोपी अल्पवयीन असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य व मोपेड दुचाकी असा 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अरुण ढाकणे (वय 42 वर्ष, रा. जाधव पेट्रोल पंपाच्यामागे कल्याणरोड, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबीचे साहित्य चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, जाधव पेट्रालपंपाच्या मागील महानगरपालीकेच्या मोकळ्या जागेतून ढाकणे यांच्या मालकीच्या जेसीबीची (एमएच 16 ए एम 7005) 35 हजार किंमतीची एक लोखंडी बकेट चोरीला गेली होती.
कोतवाली पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी पंचपीर चावडी येथे येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने दोघांनाही सापळा लावून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जेसीबीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीतील जेसीबीची बकेट व गुन्ह्यात वापरलेली एक्सेस मोपेड असा 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना संगीता बडे करीत आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, सलीम शेख, योगेश खामकर, अभय कदम, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे : यादव
समाजात काही अप्रिय घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढले आहेत. शाळकरी मुलांवर गुन्हा दाखल झाल्यास करिअरवर त्याचा विपरीत परिणाम पडतो. आपल्या पाल्याचा कोणत्याही अनुचित घटनेत समावेश होऊ नये, यासाठी पालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.