
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
भाजपने उघडपणे शिवसेना संपवण्यासाठी कशी पावले टाकली ते सर्वांना दिसत आहे. म्हणणे ऐकून घेण्यापूर्वी एखाद्याच्या हातातून पक्ष हिसकावून घेणे कितपत योग्य आहे. चिन्ह गोठवणे इथपर्यंत समजू शकतो. परंतु पक्ष वापरायला बंदी घालणे असा अभूतपूर्व निर्णय यापूर्वी इतिहासात कधीच झाला नाही. ज्या पद्धतीने निर्णय झाला त्याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगवानगडावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी श्री क्षेत्र भगवान गडावर येऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्याबरोबर विकास कामाची पाहणी करून चर्चा केली. यावेळी आ. बाळासाहेब आजबे, विश्वास नागरगोजे उपस्थित होते. 2014 पासूनच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला असा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.
या प्रश्नावर उत्तर देताना पाटील म्हणाले, अंधेरीच्या पोटनिवडणुकीपूर्वी एकंदरीत झालेल्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपने उघड उघड शिवसेना संपवण्यासाठी कशी पावले टाकली ते सर्वांना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व खा. शरद पवार यांची मैत्री होती. जुन्या काळी पवार दसरा मेळाव्याला गेलेले फोटो मी पाहिले आहेत. त्यामुळे पवार शिवसेना संपवतील हे शक्य नाही. केलेला हा सर्व प्रकार अंगलट यायला लागले म्हणून भाजपच्या बगलबच्च्याकडून अशी बेचूट विधाने केली जात आहेत.
यावेळी आ. मुंडे म्हणाले, पक्षावर बंदी आणणे ही इतिहासात कधीच न घडलेली घटना आहे. घरातील लहान मुलांना विचारलं तरी हे कुणी केलं हे सांगतील. झालेल्या निर्णयाबाबत काहीच आश्चर्य वाटले नाही, असे फडणवीस म्हणाले यावर तुमची प्रतिक्रिया काय या प्रश्नावर आ. मुंडे म्हणाले एखादा निर्णय जाहीर केला नसला तरी वाटते होणारा निर्णय त्यांना माहित असावा त्यामुळे फडणवीसांना आश्चर्य वाटले नसावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार धनंजय मुंडे भगवानगडावर दर्शनाला येणार म्हणून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता किंवा पदाधिकारी स्वागताला उपस्थित नव्हता याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.
नामदेव शास्त्री - जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी माजी मंत्री आ. पाटील व धनंजय मुंडे यांना गडाचा परिसर फिरवून दाखवला. नियोजित मंदिराच्या दगडी बांधकामाबाबत माहिती दिली. अपूर्ण बांधकाम असलेल्या इमारतीकडे बोट करून शास्त्री म्हणाले, हे भांडणाचे (पंकजा मुंडे) फलित आहे. सात वर्षांपूर्वी यात्रीनिवासचे काम सुरू होते आता बंद आहे. चला आत बसून सांगतो म्हणून पुढील चर्चा बंद दाराआड सुरू झाली. त्या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.