
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणांमध्ये उपलब्ध असलेले पाणी अथवा जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आली तरी शिल्लक असणार्या पाण्यातून शेतकर्यांच्या शेती पिकाला मिळावे, यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी दिले. दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध केला आहे. या ठरावाची प्रत राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.
पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ.सत्यजित तांबे, आ. बबनराव पाचपुते, आ. लहू कानडे, आ. आ. प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. पिण्याला, उद्योगांना पाणी आरक्षित करण्याबरोबरच शेतकर्यांच्या शेतीपिकालाही वेळेनुसार पाणी मिळेल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच पाणी शेतपीकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यकतेनुसार चार्यांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी. पाण्याचा अनाधिकृतपणे उपसा होणार नाही, यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
भंडारदरा- मुळा धरणातून दोन आवर्तने सोडण्याचे आणि आणखी दोन आर्वतने सोडण्याचे नियोजन आहे. समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेची सुनावणी येत्या 21 तारखेला होणार आहे. मराठवाड्यात ही पाणी टंचाई आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात ही पाणी टंचाई आहे. या भागात ही अनेक ठिकाणी पिण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत. जनावरांचा चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी आवर्तन सुरू केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुळा धरणातून 10 डिसेंबर, गोदावरीतून 2 डिसेंबर, भंडारदरा धरणातून 10 किंवा 12 डिसेंबरला आवर्तन सोडले जाणार आहे. तसेच पाणी शिल्लक राहिल्यास आणखी दोन आवर्तनाचा विचार आहे. निळवंडे उच्च क्षमतेचा कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उजवा कालवा 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तर डाव्या कालव्यातून निळवंडेचे पाणी कोपरगावातील रांजणगाव वेस आदी भागाला देण्याचे नियोजन आहे. तसेच टेलपर्यंत कशा पध्दतीने पाणी पोहचेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध
नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या प्रखरतेने मांडली. जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा धरणातून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. या ठरावीची प्रत राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठ्यातील जनतेने देखील वरच्या भागातील दुष्काळी स्थितीचा विचार करावा. कायद्याच्या बाजूचा आधार घेत प्रत्येक प्रश्न सुटत नाही, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी मराठवाड्यातील नेते आणि जनतेला केले.
प्रादेशिक वाद थांबावा
राज्य सरकार पातळीवर दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची योजना असणारी पश्चिम वाहिनीचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पाचा विचार सुरू आहे. वास्तवात गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे आहे. यामुळे या खोर्यातील पाणी तुट भरून निघणे आवश्यक आहे. यासाठी पश्चिम वाहिनी पाणी वळवण्याचा प्रकल्पाचा विचार होवून पाण्याचा प्रादेशिक वाद थांबायला हवा, असे पालकमंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले.
राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata
निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकर्याची मागणी लक्षात घेवून निळवंडे धरणातून सुरू असलेल्या आवर्तनाचा कालावधी वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून लाभक्षेत्राचील विविध गावातील शेतकर्यांचे शिष्टमंडळ मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून आवर्तन वाढवावे आशी मागणी करीत होते.अनेक लोकप्रतनिधी सुध्दा याबबात आग्रहीपणे करीत असलेली मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाच्या अधिकार्यांना सुरू असलेल्या आवर्तनामध्ये अधिकची वाढ करून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या.
कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत निळवंडे धरणातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी डाव्या कालव्यावरील शेतकर्यांची पाण्याची मागणीचे गांभीर्य विचारात घेतानाच डाव्या कालव्याची चाचणी तातडीने करायची आहे.उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या दिलेल्या शब्दाची पूर्तता करायची असल्याने अधिकार्यांनी याबाबत तातडीने नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
मंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे निळवंडे आवर्तनाचा कालवधी आता वाढणार असून शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळेल असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.