जायकवाडीचा उपयुक्तसाठा आज 65 टक्के
सार्वमत

जायकवाडीचा उपयुक्तसाठा आज 65 टक्के

मेंढेगिरी अहवालाच्या जोखडातून यंदाही नगर, नाशिक मुक्त होणार

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटात धुव्वाधार पाऊस झाल्याने दारणात 1170 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे पाणी एक टीएमसीहून अधिक आहे. दारणातून 16232 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सकाळी 6 वाजता गोदावरीतील विसर्ग 19490 इतका होता. इगतपुरी तालुक्यातील भावली, दारणा पाठोपाठ भाम धरणही 100 टक्के भरले आहे. तर गंगापूर धरण 76.44 टक्के भरले आहे.

जायकवाडी जलाशयात दाखल होणारा विसर्ग पाहता हे धरण आज सोमवारी 65 टक्के हाणार आहे. त्यामुळे मेंढेगिरी अहवालाप्रमाणे जायकवाडीत उपयुक्तसाठा 65 टक्के झाल्याशिवाय उर्ध्व धरणात पाणी अडवू नये, मात्र धरण आता 65 टक्के हेत असल्याने या धरणासाठी पाणी सोडण्याचे संकट टळले आहे. मात्र पाऊस सुरु असल्याने जायकवाडीत नगर, नाशिक मधून अतिरिक्त पाणी वाहून जाणार असल्याने हे धरण 100 टक्केही यंदा भरू शकते.

दारणातून 16232 क्युसेकने विसर्ग- दारणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत इगतपुरी येथे 81 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 67 तर दारणाच्या भिंतीजवळ 26 मिमी पावसाची नोंद झाली.

भावलीला 81 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात सकाळपर्यंत 1170 तर भावलीत 81 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. पाण्याची आवक वाढत गेल्याने दारणाचा विसर्ग सुरुवातीला सकाळी 6 वाजता 16232 क्युसेक इतका होता. काल दिवसभरात पावसाचे प्रमाण काहिसे घटत गेल्याने त्यानंतर टप्प्याटप्प्याने 9 वाजता तो 12158 क्युसेक इतका करण्यात आला. त्यानंतर दुपारी 2 वाजता 7940 क्युसेक इतका करण्यात आला.

पुन्हा या विसर्गात वाढ करुन तो सायंकाळी 6 वाजता 8194 क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग रात्री उशीरा पर्यंत टिकून होता. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणही काल 100 टक्के झाल्याने त्यातुन परवा विसर्ग सोडण्यात आला. 2820 क्युसेक ने भाममधून विसर्ग सोडण्यात आला. हे भामचे पाणी ही खाली दारणात दाखल होत असल्याने दारणाचा विसर्ग टिकून राहणार आहे.

गोदावरीत 19490 क्युसेकने विसर्ग- दारणातील हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने वाहत असल्याने या बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने या बंधार्‍यातून गोदावरीतील विसर्ग काल रविवारी सकाळी 19490 क्युसेक इतका होता. वरुन पाण्याची आवक घटल्याने सकाळी 11 वाजता तो 16862 क्युसेक इतका करण्यात आला. दुपारी 3 वाजता तो 14234 क्युसेक इतका करण्यात आला. तो उशीरापर्यंत टिकून होता. काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने जवळपास साडेआठ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

गंगापूर आज 80 टक्के होणार !

गंगापूर धरण काल सकाळी 76.44 टक्क्यांपर्यत पोहचले होते. 5630 क्षमतेच्या या धरणात 4304 दलघफू पाणीसाठा तयार झाला होता. काल सकाळी 6 पर्यंत गंगापूरला 70, त्र्यंबकला 51, अंबोलीला 116 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 295 दलघफू पाणी दाखल झाले. कश्यपी 37.14 टक्के, गौतमी धरणात 47.74 टक्के इतका साठा झाला आहे.

काल रविवारी दिवसभरातील 12 तासात गंगापूरला 50, त्र्यंबकला 15, गौतमीला 8, कश्यपीला 11, अंबोलीला 25 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रात्रीतून गंगापूर 80 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल असा अंदाज आहे.

अन्य धरणांचे साठे असे- पालखेड 65.59 टक्के, कडवा 87.10 टक्के, मुकणे 59.16 टक्के, भोजापूर 100 टक्के, आळंदी 16.67 टक्के, कश्यपी 37.14 टक्के, वालदेवी 71.47 टक्के, गौतमी गोदावरी 47.74 टक्के, वाकी 47.67 टक्के, भाम 100 टक्के.

जायकवाडी 63.21 टक्के !

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 17778 हजार क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत होती. काल 6 वाजता या धरणात 63.21 टक्के पाणीसाठा होता. उपयुक्तसाठा 48.47 टिएमसी तर मृतसह एकूण साठा 74.54 टीएमसी इतका झाला होता. या धरणासाठी मेंढेगिरी समितीच्या शिफारशी प्रमाणे आता या धरणात 3 टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतर या धरणात नगर नाशिक धरणांतील पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. 76 च्या 65 टक्के म्हणजेच जवळपास 50 टीएमसी पाण्याची गरज आहे. आणि आता 48.47 टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याने आता अवघा दीड टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे आज संध्याकाळ पर्यंत विसर्ग चांगला राहिला तर आज हा साठा 65 टक्क्यांवर जाऊ शकतो.

जायकवाडी बाबात यापूर्वीच जो अंदाज सार्वमत मध्ये व्यक्त केला होता, त्याप्रमाणे जायकवाडीचा उपयुक्तसाठा 65 टक्के पूर्ण होईल. एवढेच नव्हे तर यवर्षी जायकवाडीचा साठा 100 टक्क्यांकडे निश्चितच वाटचाल करेल. त्या दृष्टीने पुढील हंगामाचे पिकांचे उचित नियोजन होणे योग्य राहिल.

- उत्तमराव निर्मळ (निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग)

नगर व नाशिक जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, औद्योगिक व विजनिर्मिती केंद्राचे दारणा धरणा वर 56टक्के आरक्षण व गंगापूर धरणावरती 78टक्के आरक्षण असताना एमडब्लुआरआरए ने व उच्च न्यायालयाने दुर्दैवाने या बाजू लक्षात न घेता मेंढेगीरी समीतीचा अहवाल जसाचा तसा स्विकारला व जोपर्यंत जायकवाडी जलाशयात जोपर्यंत 65टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत नगर व नाशिक जिल्ह्यातील बारामाही लाभक्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकरयांना जायकवाडी धरण 65टक्के भरल्यावरच आपल्या भागातील धरणे भरल्याचा आनंद ऊत्सव साजरा करता येतो. थोडक्यात जायकवाडी 65टक्के भरल्यावर जायकवाडीच्या सुलतानी कायद्याच्या संकटातून सुटलो बुआ! अशी नगर नाशिक जिल्ह्यातील जनतेची व शेतकरी बांधवांची भावना होते.

- राजेंद्र कार्ले, लाभधारक शेतकरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com