नेवासा (का. प्रतिनिधी) -

जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या पट्ट्यातील शेतकर्यांना अधिकारी व कर्मचार्यांकडून पाणीपट्टी वसुलीच्या नावाखाली त्रास दिला जात असून

जायकवाडी लाभधारक प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची कर्मचार्यांकडून लूट झालेली निदर्शनास आल्यास यापुढे अशा अधिकारी व कर्मचार्यांना या पट्ट्यात फिरण्यास बंदी घालण्यात येईल, असा इशारा नेवासा येथील समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी दिला आहे.

श्री. घुले यांनी याबाबत पत्रकात म्हटले की, जायकवाडी प्रकल्पग्रस्त व लाभधारक गावांच्या पट्ट्यात भरदिवसा दरोडा घालणारी एक सरकारी टोळी (जायकवाडी सिंचन प्रकल्प कर्मचारी) राजरोसपणे फिरत आहे. जायकवाडीच्या पट्ट्यातील धरणग्रस्त शेतकर्यांनी आपल्या जमिनी, घरं यांचा त्याग करून या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या पाण्यावर पहिला हक्क हा धरणग्रस्त शेतकर्यांचा आहे.

त्याकाळी शेतकर्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दिलेल्या तोकड्या पाणी परवानग्यांचा आणि थकबाकीचा बागुलबुवा दाखवून हे कर्मचारी शेतकर्यांकडून पैसे जमा करत आहेत. काही गावांमधून तर या भुकबळी कर्मचार्यांनी धान्य जमा केले असल्याचा दावाही श्री. घुले यांनी केला आहे. ज्या शेतकर्यांनी पैसे भरल्याच्या पावत्या मागितल्या त्या शेतकर्यांना पावती मिळते तीही जेवढी रक्कम दिली तेवढ्या रकमेची मिळत नाही.‘मागील बाकी’ असा शेरा टाकून काही रकमेची पावती दिली जाते. एकूण थकबाकी किती व भरलेली किती याची माहिती हे कर्मचारी कोणालाच देत नाहीत.

औरंगाबाद एमआयडीसीची जायकवाडीच्या पाण्याची सुमारे चारशे कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. त्याच्या वसुलीबाबत कोणतीही हालचाल नाही आणि धरणग्रस्त शेतकर्यांनी वापरलेल्या हक्काच्या पाण्याची पट्टी वसुलीसाठी कर्मचारी भर उन्हाळ्यात शेतकर्यांच्या मोटारी जप्त करतात...हा कुठला न्याय?

जायकवाडीच्या उद्दाम लुटारुंच्या जोखडातून लाभधारक प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची कायमची सोडवणूक केल्याशिवाय ‘समर्पण’ स्वस्थ बसणार नाही. एकाही शेतकर्याची जर यापुढे या कर्मचार्यांकडून लूट झालेली आमच्या निदर्शनास आली तर सर्व जायकवाडीच्या अधिकारी व कर्मचार्यांना जायकवाडीच्या पट्ट्यात फिरण्याची बंदी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पावती न देता होतेय पाणीपट्टी वसुली

जायकवाडी प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील नेवासा तालुक्यातील गावांमध्ये सिंचन प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी फिरतात. शेतकर्यांकडून सक्तीने पाणीपट्टीच्या वसुलीसाठी रक्कम घेतात. मात्र जेवढी रक्कम घेतली तेवढ्याची पावती देत नाहीत. नेमकी थकबाकी किती हेही सांगत नाहीत. वसुलीच्या नवाखाली काही शेतकर्यांकडून हे कर्मचारी अन्नधान्यही घेऊन जातात. असे लुटारु कर्मचारी फिरत असल्याचे यापुढे निदर्शनास आल्यास त्यांना फिरण्यास बंदी घातली जाईल.

-डॉ. करणसिंह घुले

अध्यक्ष, समर्पण फाऊंडेशन नेवासा