जायकवाडीचा उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर

पावसाअभावी धरणांचे विसर्ग घटले, गोदावरीचा विसर्ग कधी बंद तर कधी सुरु
जायकवाडीचा उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधून विसर्ग कमी प्रमाणात सुरु आहेत. गोदावरीच्या विसर्गातही कधी खंड तर कधी सुरु! अशी स्थिती आहे. काल गोदावरीतून 1614 क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरु होता तर प्रत्यक्ष जायकवाडी जलाशयात इतर ठिकाणचेही पाणी दाखल होत या धरणात 10 हजार 344 क्युसेकने आवक सुरु होती. त्यामुळे काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडीचा उपयुक्तसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

यंदा गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 15.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. जायकवाडीत यंदा 40.9 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे नांदूरमधमेश्वर ते जायकवाडी जलाशय या अंतरातील ओढे, नाल्यांचे पाणी, प्रवरेतील काही अंशी पाणी आणि गंगापूर, वैजापूर तालुक्यातील छोट्या छोट्या नद्या, नाले, ओढे यातील पाणी, आणि जायकवाडीच्या मुक्त पाणलोटातील पाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने यंदा जायकवाडीत चांगले पाणी दाखल झाले.

काल सकाळी मागील 24 तासात जायकवाडी जलाशयात 1.3 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार 79.73 टक्के पाणीसाठा झाला होता. हा उपयुक्तसाठा 80 टक्क्यांच्या जवळपास आहे. अजुनही पावसाचा अंदाज जाणकार व्यक्त करत असल्याने या जलाशयातील साठा अजुन फुगणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांचे उपयुक्त साठ्यांची टक्केवारी सरासरी कालच्या तारखेला 93.68 टक्के इतकी होती. तर यंदाची काल 88.71 टक्के इतकी आहे. दारणा, भाम, भावली, वालेदवी, गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, कडवा, आळंदी ही धरणे 100 टक्के भरली आहेत तर मुकणे 72.44 टक्के, वाकी 83.63 टक्के अशी कालची धरणांची स्थिती आहे. या धरणांपैकी सर्वाधिक विसर्ग दारणा धरणातून झाला. दारणातून कालपर्यंत 8.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल या धरणातून 550 क्युसेकने विसर्ग सुरु होता.

गंगापूरमधून यंदा 1.5 टिएमसी विसर्ग करण्यात आला. काल या धरणातून 285 क्युसेकने विसर्ग सुरु होता. कडवातून जवळपास 1 टिएमसी, आळंदीतून 122 दलघफू, वालदेवीतून 684 दलघफू, असे विसर्ग करण्यात आले. नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीचा उजवा 200 क्युसेकने तर डावा 75 क्युसेकने वाहत आहे तर एक्सप्रेस कालवा 705 क्युसेकने सुरु आहे.

चक्रीवादळाचा परिणाम

बंगालच्या उपसागरातील चक्रीय वादळ दि. 26 सप्टेंबरला आंध्रप्रदेशाच्या उत्तर भागात प्रवेश करुन विदर्भ मराठवाडा तसेच खानदेशातून दि. 30 पर्यंत गुजरात मार्गे अरबी समुद्रात जाऊन ओमानकडे जाताना तीव्र होईल. या चक्रीय वादळाचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकणपट्टीतील उत्तर भागात काही भागात अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस पडेल.

या चक्रीय वादळाच्या वेग जर ताशी 63 किमी पेक्षा जादा झाला तर त्याचे गुलाब असे नामकरण होईल. हे नाव पाकिस्तानने सुचविलेले आहे. या वादळाचे आंध्र किनारपट्टीपासूनचे अंतर पहाता, त्याचा तासी वेग 63 किमी पेक्षा जास्त जाण्याची शक्यता कमी वाटते.

परंतु अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात हा पाऊस सार्वत्रिक स्वरुपात राहाणार नाही. काही वेळेसाठी, विखुरलेल्या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. विशेषतः दि. 28 व 29 तारखेला ही शक्यता आहे. नाशिक, अहमदनगरच्या सर्व घाटमाथा भागात दि. 28 व दि. 29 सप्टेंबरला मध्यम स्वरुपात पाऊस पडेल. त्यामुळे सध्या चालू असलेल्या ओव्हरफ्लोचा कालावधी वाढेल.

दि. 29 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले दुसरे चक्रीय वादळ ओरिसातून ग्वाल्हेर पर्यंत जाऊन परत दि. 3 ऑक्टोबरच्या दरम्यान परत मागे फिरेल. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवट्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल.

- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

Related Stories

No stories found.