
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण घटल्याने धरणातील विसर्ग घटविण्यात आले आहेत. परिणामी नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने जाणारा गोदावरीतील विसर्ग 19354 क्युसेक इतका करण्यात आला आहे. खाली जायकवाडी धरणातील उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजता 82.16 टक्के इतका झाला आहे.
काल दिवसभरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. गंगापूर च्या भिंतीजवळ काल दिवसभरात 18 मिमी, त्र्यंबकला 18 मिमी, अंबोलीला 29 मिमी, कश्यपीला 7 मिमी, गौतमीला 14 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. त्यामुळे धरणांमध्ये पावसाची आवक मंदावली असल्याने विसर्ग कमी करण्यात आले आहेत. दारणाच्या परिसरातही हीच स्थिती आहे. काल सायंकाळी दारणातून 4064 क्युसेक, कडवातून 1294 क्युसेक, वालदेवी 183 क्युसेक, गंगापूर मधुन 1825 क्युसेक, आळंदीतून 687 क्युसेक, भोजापूर 540, पालखेड 4428 क्युसेक असा विसर्ग सोडण्यात येत होता.
दारणात काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत 604 दलघफू नवीन पाणी दाखल झाले होते. यात भावली सारख्या फिडर डॅमचा विसर्ग दाखल होत होता. तसे घाटमाथ्यावरील झरे सुरु असल्याने आवक सुरु आहे. या धरणातून सकाळी 6728 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होती. नंतर हा विसर्ग 11 वाजता 4064 क्युसेकवर आणण्यात आला. गंगापूर मध्ये काल सकाळी मागील 24 तासांत 232 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. धरणांमधील विसर्ग घटविण्यात आल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीत 19354 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे.
काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासुन नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 34.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
10 धरणं फुल्ल !
नाशिक ची 10 धरणे 100 टक्के भरली आहेत. बहुतांश्ी लघुप्रकल्प आहेत. त्यात भाम, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, हरणबारी, केळझर ही धरणे भरली आहेत. नाशिक च्या धरणांमध्ये मागील वर्षी अवघा 24.41 टक्के पाणी साठा कालच्या तारखेला होता. तर काल धरणांमध्ये 78.43 टक्के पाणीसाठा झाला होता.
खाली जायकवाडीत काल सायंकाळी 6 च्या आकडेवारीनुसार या जलाशयात 48 हजार 440 क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत होती. या जलाशयात काल सायंकाळी 81.89 टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. उपयुक्तसाठा 62.79 टीएमसी इतका झाला आहे. तर मृतसह एकूणसाठा 88 टिएमसी पर्यंत पोहचला आहे. परवा पासुन या धरणाच्या जलविद्युतक केंद्रातून गोदावरीत 1589 क्युसेक तर उजव्या कालव्याला 300 क्युसेक असा एकूण विसर्ग 1889 क्युसेक ने सुरु आहे.
खरीपासाठी सात क्रमांकाचे अर्ज !
गोदावरीच्या कालव्या अंतर्गत खरीप हंगाम 2022-23 यातील खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी पाणी मागणीचे सात क्रमांकाचे अर्ज 19 ऑगस्ट 2022 सायंकाळी 5.45 पर्यंत दाखल करावेत, असे जाहिर प्रकटन जलसंपदा विभागाने काढले आहे.
विहीरीवरील उभी पिके व पेरणी झालेली चारा पिके, अन्नधान्य पिके, कडधान्य व तेलबिया पिके यांच्यासाठी नमुना नंबर 7 चे अटी व शर्तीनुसार पाणी पुरवठा करावयाचे प्रस्तावित आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरणार्या नियोजनानुसार सिंचनाचे नियोजन करण्यात येईल, असे प्रकटनात स्पष्ट करण्यात आले आहे.