नगर, नाशिकच्या धरणांचे पाणी सोडण्याचे संकट टळले,जायकवाडीने ओलांडली पासष्टी

! पाऊस थांबला
नगर, नाशिकच्या धरणांचे पाणी सोडण्याचे संकट टळले,जायकवाडीने ओलांडली पासष्टी

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

जायकवाडी जलाशयात काल दुपारीच 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला! त्यामुळे नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहेर्‍यावर हसू फुलले आहे. काल सायंकाळी 6 वाजता हे धरण 66.54 टक्के भरले होते.

काल जायकवाडीच्या जलाशयात गोदावरीतून मुळा-प्रवरातून विसर्ग दाखल होत होता. काल सायंकाळी सरासरी 57 हजार 457 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. याच वेळी हा साठा 66.54 टक्के पाणीसाठा झाला होता. 51.02 टीएमसी उपयुक्तसाठा तयार झाला होता. तर एकूण साठा 77 टीएमसी इतका झाला होता. काल सहा वाजता पाण्याची आवक पाहता या धरणातील साठा आज गुरुवारी सकाळी 55 टीएमसी पर्यंत पोहचलेला असेल.

15 ऑक्टोबरला जायकवाडी जलाशयात 65 टक्के म्हणजेच 50 टीएमसी उपयुक्तसाठा असेल तर उर्ध्व धरणातून पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. असे समन्यायी कायद्यात म्हटले आहे. काल या धरणात उपयुक्तसाठा 51 टीएमसी झाला होता. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत जायकवाडीत जवळपास साडेतीन टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. आवक पाहता या साठ्यात वाढ होणार असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याची चिंता मिटली आहे.

गोदावरीतील विसर्ग घटला !

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील पावसाने काल दिवसभर विश्रांती घेतली आहे. पावसाची रिपरिप कमी झाल्याने धरणातील विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणातून काल सायंकाळी 6 वाजता 2672 क्युसेकवर आणण्यात आला आहे. गंगापूर चा विसर्ग 553 क्युसेक, कडवातून 1272 क्युसेक, वालदेवीतून 599 क्युसेक, आळंदी 80 क्युसेक, त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातील आवक कमी झाल्याने गोदावरीतील विसर्ग 20823 क्युसेकवरुन काल दुपारी 12 वाजता 15041 क्युसेक वर आणण्यात आला. त्यानंतर तो सायंकाळी 6 वाजता 8040 क्युसेकवर आणण्यात आला. 1 जून पासून काल सकाळी 6 पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात एकूण जायकवाडीच्या दिशेने 12.1 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी उजवा कालवा 275 तर डावा कालवा 137 क्युसेक ने सुरु आहे.

धरणातील पाणी साठे

दारणा 97.96 टक्के, मुकणे 71.58 टक्के, वाकी 76.16 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 97.69 टक्के, कश्यपी 82.72 टक्के, गौतमी गोदावरी 96.20 टक्के, कडवा 99.17 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 40.44 टक्के, पालखेड 96.17 टक्के, असा पाणीसाठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला नाशिक जिल्ह्यातील धरणातील उपयुक्तसाठा 90.89 टक्के इतका होता. काल तो 84.27 टक्के इतका आहे.

आज दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी जायकवाडीमधील जिवंत पाणी साठा 51 टीएमसी म्हणजेच 66.50 टक्के झालेला आहे. तसेच खरीपातील झालेला पाणी वापरही यात समाविष्ट होणार आहे. या स्थितीत समन्यायी कायद्यानुसार पर्याय क्रमांक तीन प्रमाणे जायकवाडीतील जिवंत पाणी साठा एकुण जिवंत साठ्याच्या (76 टीएमसी) 65 टक्के झाल्याने यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या संकटातून सुटका झाली आहे. नगर, नाशिक साठी ही समाधानाची बाब आहे.

- उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com