कोणत्याही क्षणी जायकवाडी ओव्हरफ्लो !

72 हजार 407 क्युसेकने पाण्याची आवक, गोदावरीतून 20 हजार 424 क्युसेकने विसर्ग
कोणत्याही क्षणी जायकवाडी ओव्हरफ्लो !
जायकवाडी

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

मराठवाडा तसेच मुक्त पाणलोटातील धुव्वाधार पाऊस आणि गोदावरीच्या काठावरील जोरदार पावसाने जायकवाडी च्या जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता तब्बल 72 हजार 407 क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत होती. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने हे धरण 95 टक्के भरताच विसर्ग सोडण्यात येणार आहे.

मध्यरात्री 89 टक्के पाणी साठा झाला होता. नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातून या धरणात आणखी नवीन पाण्याची आवक होणार आहे. तसेच पाऊसही सुरू आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पूर्ण क्षमतेने धरण न भरता काहीसे रिकामे ठेऊन या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गोदवरीतून काल सायंकाळी 20 हजार 424 क्युसेकने विसर्ग सुरू होता. यंदाच्या हंगामात तिसर्‍यांदा ही नदी दुथडी होत आहे. काल सकाळी 6 वाजता जायकवाडीत 85 टक्के पाणीसाठा होता. तर नवीन पाण्याची आवक 17481 क्युसेक ने सुरु होती. काल मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर तसेच जायकवाडी जलाशयाच्या मुक्त पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे जायकवाडी जलाशयात काल या जलाशयात सायंकाळी 6 वाजता 64 हजार 653 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. त्यात रात्रीतून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहचला होता. उपयुक्तसाठा 67.05 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्याने हा साठा सकाळी 90 टक्क्यांच्या पुढे जावु शकतो.

सलग 24 तास ही आवक अशीच टिकून राहिली तर या जलाशयात 5 टीएमसी पर्यंत पाणीसाठा वाढू शकतो. किमान अजून 10 टीएमसी पाण्याची नवीन आवक झाली तर हा जलाशयात दोन दिवसात तुडूंब होऊन विसर्ग त्यातून सुरु होऊ शकतो. उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजता 67 टीएमसी इतका होता. 76 टीएमसी उपयुक्तसाठा झाल्यावर हे धरण तुडूंब होते. म्हणजेच 9 ते 10 टीएमसी पाण्याची गरज आहे. काल सायंकाळी मृतसह एकूण साठा 93 टीएमसी पर्यंत पोहचला होता. या धरणाची मृतसह एकूण साठ्याची क्षमता 102 टीएमसी इतकी आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी जायकवाडी बाबत महिना अखेरीस तुडूंब होईल, असे भाकित केले होते. ते खरे ठरण्याची चिन्हे आहेत.

गोदावरी दूथडी!

नाशिक भागात तसेच धरणांच्या पाणलोटात पडत असलेल्या पावसाने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने काल सायंकाळी या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 20424 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. या मुळे गोदावरी पुन्हा दूथडी भरुन वाहु लागल्याने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल सकाळ पासुन पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे 285 क्युसेक ने विसर्ग सुरु असलेल्या या धरणातुन सकाळी 9 वाजता 2058 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येवू लागला. तीन तासानंतर दुपारी 12 वाजता तो 3426 क्युसेक इतका करण्यात आला. दारणाच्या पाणलोटातही संततधार सुरु होती. इगतपुरी, घोटी, भावली परिसरात पावसाची संततधार असल्याने दारणात पाण्याची आवक वाढू लागल्याने 550 क्युसेक ने सुरु असलेला विसर्ग काल सायंकाळी 1100 क्युसेक इतका करण्यात आला. गंगापूर मधुन 3426 क्युसेक, दारणातुन 1100 क्युसेक, वालदेवीतुन 183 क्युसेक, कश्यपीतुन 450 क्युसेक, याशिवाय नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या मुक्तपाणलोटातुन व नाशिक शहर परिसरातून पावसाची संततधारे मुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने काल सायंकाळी या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 20424 क्युसेक ने पाणी सोडण्यात येवु लागले. या बंधार्‍याचे सर्व गेट वर उचलण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी दुथडी भरुन पुन्हा वाहु लागली आहे.

सतर्कतेचे आदेश

जायकवाडी धरणात पाण्याची जोरदार आवक होत असल्याने हे धरण भरण्याची शक्यता आहे. धरण कोणत्याही क्षणी भरल्यास पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडला जाऊ शकतो. त्यामुळे जायकवाडी प्रशासनाने बीड तसेच औरंगाबाद जिल्हधिकार्‍यांना पूरपरिस्थितीची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.