सरकारचे मुक्त बाजारपेठ धोरण शेतकर्‍यांना मारक
सार्वमत

सरकारचे मुक्त बाजारपेठ धोरण शेतकर्‍यांना मारक

अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांची टीका

Arvind Arkhade

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

केंद्र सरकारचे मुक्त बाजारपेठ धोरण शेतकर्‍यांना मारक असल्याची टीका अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली.

दै. सार्वमतशी बोलताना श्री. सूर्यवंशी म्हणाले, मुक्त बाजारपेठ आणि आणि शेतकर्‍यांना स्वतःच्या मालाची किंमत ठरवण्याचा आणि भाव ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यांना दिला आहे. त्यामुळे हमी भाव धोरण मागे गेले आहे. परदेशात शेतकर्‍यांना संरक्षण दिले जाते. सबसिडी दिली जाते. त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यांच्या मालाची किंमत सुद्धा कमी आहे.

त्यामुळे त्यांच्यापुढे भारतीय शेतकरी टिकाव धरू शकणार नाही. शेतीचे संरक्षण काढले तर शेतकर्‍यांना शेती सोडावी लागेल. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील. यामध्ये शेतकर्‍यांच्या ऐवजी व्यापार्‍यांचे मोठे होतील. कार्पोरेट कंपन्यांना शेतीमध्ये उतरता येणार असल्याने प्रथम छोट्या शेतकर्‍यांचा नंतर मोठ्या शेतकर्‍यांचा बळी जाणार आहे. काही शेतकरी संघटनांना मुक्त बाजारपेठ पाहिजे.

हे सर्व शेतकरी किंवा शेतकरी संघटनांचे मत नाही. केंद्र सरकारचा नवीन अध्यादेश शेतकर्‍यांना मारणारा आहे. शेती कसण्यासाठी सरकार मदत करणार नसेल तर शेतकर्‍यांचे मरण ठरणारा हा अध्यादेश असेल याच्या विरोधात आवाज उठवावाच लागेल.

नवीन अध्यादेशात तीन अध्यादेश काढले आहेत. यामध्ये व्यापार्‍यांची माल साठवण क्षमता काढून टाकली आहे. त्यामुळे ते कितीही साठा करू शकतात. त्यामुळे साठेबाजी होऊ शकते. शेतकर्‍यांना आपला माल कोठेही विकता येईल आणि आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा आधिकार मिळाला आहे पण व्यापार्‍यांनी जर शेतीमाल खरेदी केला नाही तर शेतकर्‍यांचा नाईलाज होऊन व्यापारी मागतील त्या भावात माल विकावा लागेल.

त्यामुळे मुक्त बाजाराला काही अर्थ राहणार नाही. या धोरणामुळे शेतकरी संकटात येईल. आणि कार्पोरेट कंपन्या शेतीमध्ये करार पद्धतीने उतरण्यासाठी परवानगी दिल्यामुळे छोटा शेतकरी टिकाव धरू शकणार नाही. कारण मोठ्या शेतीचा उत्पादन खर्च कमी राहणार असल्याने त्यांच्या मालाचा भावही कमी असणार आहे.

तर छोट्या शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च जास्त असल्याने मालाचा भावही जास्त राहील. असे झाले तर छोटा शेतकरी कोलमडून जाईल. त्यामुळे देशातील शेतीचे संरक्षण काढणे योग्य ठरणार नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com