जवखेडे तिहेरी हत्याकांड; 10 मे रोजी निकाल

जवखेडे तिहेरी हत्याकांड; 10 मे रोजी निकाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांच्या हत्याकांड प्रकरणी येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल 10 मे 2022 रोजी दिला जाणार आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यार्लगड्डा यांनी निकालाची तारीख जाहीर केली आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून आहे.

सदर खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस पोलिसांनी जप्त केलेल्या काही वस्तू संदर्भात सरकारी पक्ष आणि आरोपी वकिलांच्यावतीने आक्षेप घेण्यात आले होते. या दोन्ही आक्षेपांवर बुधवारी न्यायालयाने दोन्ही पक्षांत समक्ष पडताळणी करून घेतली.

तसेच या खटल्यातील आरोपींनी न्यायालयात अर्ज केलेला आहे की, त्यांच्यावतीने काम बघणारे वकील सुनील मगरे आणि छगन गवई हे गेल्या सात वर्षांपासून कोणतीही फी न घेता कामकाज पाहत आहेत. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणामार्फत आरोपीच्या वकिलांना दिले जाणारे मानधन वकील मगरे आणि गवई यांना द्यावे. या अर्जावर विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव- पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. आरोपींचे वकील हे विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनलवरील वकील नाहीत. खटल्याची सुनावणी संपलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे. वकिलांना मानधन देण्याच्या अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवलेला आहे.

Related Stories

No stories found.