
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील जवळा येथे शालेय विद्यार्थिनी अत्याचार व हत्या प्रकरणात 23 पैकी 15 डीएनए अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही पारनेर पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नसल्याने नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
20 ऑक्टोबर 2021 ला जवळा येथे एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तालुक्यासह राज्यात तीव्र पडसाद उमटले. आंदोलने झाली तर राजकीय पुढार्यांनी भेटी देत वातावरणही तापवले. परंतु दीड महिन्यांच्या कालावधीत पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले नाही. दरम्यान, पारनेर पोलिसांनी 23 जणांचे नमुने डीएनए तपासणीसाठी घेतले होते.
नाशिक प्रयोगशाळेत तपासणी होऊन 15 अहवाल आले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. अद्याप आठ तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. या घटनेतील तपासाला गती येताना दिसत नाही. यामुळे नागरिक संतापलेले आहेत. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना विचारले असता आठ-दहा दिवसांत काहीतरी हाताला लागेल, असे सांगितले जात आहे. जर आठ दहा दिवसांत आरोपी पकडले गेले नाहीतर, पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जवळे ग्रामस्थांनी दिला आहे.
पारनेर पोलिसांनी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. जर आठ दहा दिवसांत काही ठोस हाती लागले नाही तर किंवा आरोपी पकडले गेले नाहीतर जवळे ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन केले जाईल.
- रामदास घावटे, जवळे, ता.पारनेर.